Reliance Industries New Leadership : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा सुरू  झाली आहे. ईशा अंबानी-पिरामल, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यापैकी कोणाकडे रिलायन्सची सूत्रे जाणार याची चर्चा सुरू आहे. या तिघांकडेही सध्या रिलायन्समधील महत्त्वाची जबाबदारी आहे. 


ईशा अंबानी - टेक्नॉलॉजी ते फॅशन 


मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिची सर्वाधिक चर्चा सुरू असते. येल विद्यापीठातून ईशा अंबानीने पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याशिवाय मॅकेन्झी अॅण्ड कंपनीमध्ये काही काळ कामदेखील केले आहे. ईशा अंबानी सध्या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये 2014 पासून संचालक आहे. त्याशिवाय रिलायन्स फाउंडेशनमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून भूमिका बजावत आहे. मागील दोन वर्षात ईशा अंबानीची भूमिका महत्त्वाची झाली आहे. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 9.99 टक्के भागिदारी खरेदी केली. या करारामागे ईशा अंबानीने मोठी भूमिका बजावली आहे. ईशा अंबानी सध्या रिलायन्सचं फॅशन पोर्टल Ajio चे ही काम करत आहे. त्याशिवाय ई-कॉमर्स व्हेंचर जिओमार्टचे कामदेखील पाहते. 


आकाश अंबानी- जिओमध्ये महत्त्वाची भूमिका 


मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओमध्ये संचालक आहे आणि कंपनीच्या कार्यकारी समितीचा सदस्य देखील आहे. आकाश सध्या रिलायन्स जिओचे स्ट्रॅटेजी हेड देखील आहे. रिलायन्स जिओच्या मेसेजिंग, चॅटसह इतर सेवांवर त्यांचे लक्ष असते. त्याशिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. फुटबॉलमधील इंडिया सुपर लीगशीदेखील संबंधित आहेत. टेक्नॉलॉजीमधील कराराच्या अनुषंगाने आकाश अंबानी ईशा अंबानीसोबत काम करतो. आकाश अंबानीने ब्राउन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. 


अनंत अंबानी : ग्रीन एनर्जी ते गुजरातमधील प्राणिसंग्रहालय प्रकल्प


अनंत अंबानीला रिलायन्स उद्योगसमूहामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. Reliance Green Business मधील रिलायन्स न्यू एनर्जी सोलर आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जीमध्ये संचालक आहे. एक वर्षापूर्वी अनंत अंबानीचा जिओ प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. इतकंच नव्हे तर गुजरातमधील रिलायन्सच्या प्राणिसंग्रहालय प्रकल्पावरही अनंत अंबानीची देखरेख असते.