8th Pay Commission: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसांत वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा चालू झाली आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते. याआधी जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता. आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा चालू आहे.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो, याची वाट पाहात आहेत. या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे. या आयोगाच्या शिफारशी 2026 मध्ये लागू होणार आहेत. भारतात याआधी सर्वांत पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये लागू झाला होता.
नवे सरकार घेऊ शकते निर्णय
आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. आता लोकसभेची निवडणूक संपली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारण 49 लाख शासकीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शनवाढीचा फायदा होईल. आठव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचीही शिफारस केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फायनॅन्शियल एक्स्प्रेसनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगात 14 टक्क्यांनी पगारवाढ
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारण 14.29 टक्क्यांनी वाढ झाली होती. यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनही 18 हजार रुपये करण्यात आले होते. त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगातर्फे चांगल्या शिफारशी केल्या जातील, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
10 लाख गुंतवा अन् 4.50 लाख व्याज मिळवा! पोस्टाच्या 'या' जबरदस्त योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
'या' कंपनीचा नाद खुळा! दोन वर्षांत दिले तब्बल 500 टक्क्यांनी रिटर्न्स; 10 हजारांचे झाले 50 हजार!