Food Inflation in India: सरकार अन्नधान्याच्या किंमती (Food prices) कमी करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सातत्यानं धोरणात बदल करत आहे. सरकारच्या धोरणामुळं जानेवारी महिन्यात महागाई, विशेषत: खाद्यपदार्थांची महागाई कमी झाली आहे. यामुळं सर्वसामान्यांचं जेवणाचं ताट स्वस्त झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. जानेवारी महिन्यात कांद्यासह टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे.
व्हेज थाळीचा भाव किती?
क्रेडिट रेटिंग एजन्सीने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, जानेवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी व्हेज थाळीची किंमत 28 रुपयांपर्यंत खाली आली होती. महिन्याभरापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये व्हेज थाळीची किंमत 29.7 रुपये होती. मात्र, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आजही भाव जास्त आहेत. एक वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये व्हेज थाळीची किंमत 26.6 रुपये होती.
रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक सुरु
क्रिसिलचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेची धोरणात्मक बैठक सुरु आहे. रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती 2024 ची पहिली आणि आर्थिक वर्ष 2023-24 ची शेवटची धोरण बैठक घेत आहे. ही बैठक 6 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 8 फेब्रुवारीला म्हणजे उद्या संपणार आहे. केंद्रीय बँकेचा व्याजदराचा निर्णय महागाई, विशेषतः किरकोळ महागाई लक्षात घेऊन या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
कांदा आणि टोमॅटोच्या दरात घसरण
जानेवारी महिन्यात सामान्य लोकांसाठी जेवणाच्या ताटांच्या किमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे कांदा आणि टोमॅटो स्वस्त होणे. अहवालानुसार, जानेवारी महिन्यात मागील महिन्याच्या तुलनेत कांद्याचे भाव 26 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचबरोबर या काळात टोमॅटोच्या भावात 16 टक्क्यांनी घसरण झाली आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठ्यात सुधारणा झाल्याने कांद्याला दिलासा मिळत आहे, तर उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांतून नवीन आवक झाल्याने टोमॅटोचे भाव मंदावले आहेत.
व्हेज थाळीच्या किमती वाढण्याचे कारण काय?
वार्षिक आधारावर पाहिल्यास, व्हेज थाळीच्या किमती वाढण्याचे कारण केवळ कांदे आणि टोमॅटोच नाही तर डाळी आणि तांदूळ देखील आहेत. CRISIL च्या मते, एक वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 च्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये कांदा 35 टक्के महागला आहे, तर टोमॅटोचे दर वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी जास्त आहेत. जानेवारी 2023 च्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये डाळी आणि तांदळाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळेच गेल्या महिन्यात व्हेज थाळीच्या किमती दरवर्षी वाढल्या आहेत.
मांसाहारी थाळी झाली स्वस्त
मांसाहारी थाळीची किमती मासिक आणि वार्षिक अशा दोन्ही प्रकारे कमी झाल्या आहेत. या वर्षी जानेवारीत मांसाहारी थाळीची सरासरी किंमत 52 रुपये होती. याच्या एक महिना आधी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये, किंमत 56.4 रुपये होती, तर एक वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये, किंमत 59.9 रुपये होती.
महत्वाच्या बातम्या: