India : भारत आणि अमेरिकेतील (US) व्यापार नवीन उंचीवर पोहोचलाय. त्यामुळे चीनला (China) मागे टाकत आता अमेरिका भारताचा पहिल्या नंबरचा व्यापारी भागीदार असलेला देश बनला आहे. 2021-22 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. पूर्वी चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक संबंध मजबूत होत असल्याने येत्या काही वर्षांत अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढत जाईल, असे व्यापार तज्ज्ञांचे मत आहे.


अमेरिका-भारत व्यापार 119.42 अब्ज डॉलरवल


वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 119.42 अब्ज डॉलर आहे. 2020-21 मध्ये तो 80.51 अब्ज डॉलर होता. अमेरिकेतील निर्यात 2021-22 मध्ये 76.11 बिलियन डॉलर झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षात 51.62 अब्ज डॉलर होती. 2020-21 मध्ये सुमारे 29 अब्ज डॉलरच्या तुलनेत आयात वाढून 43.31 अब्ज डॉलर झाली आहे.


चीन-भारत व्यापार 115.42 अब्ज डॉलर 


 2021-22 मध्ये भारताचा चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापार 2020-21 मध्ये 86.4 अब्ज डॉलरवरून 115.42 अब्ज डॉलर  झाला आहे. 2020-21 मध्ये चीनला 21.18 अब्ज डॉलरची निर्यात केली. गेल्या आर्थिक वर्षात ही निर्यात 21.25 अब्ज डॉलर  होती. 2021-22 मध्ये आयात सुमारे  65.21 अब्ज डॉलर वरून  94.16 अब्ज डॉलर  झाली. दोन्ही देशांमधील व्यापारातील तफावत 2021-22 मध्ये  72.91 बिलियन डॉलर  झाली जी मागील आर्थिक वर्षात  44 अब्ज डॉलर  होती.


भारत एक विश्वसनीय व्यापार भागीदार
भारत एक विश्वासू व्यापारी भागीदार म्हणून उदयास येत आहे आणि जागतिक कंपन्या त्यांच्या पुरवठ्यासाठी चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आहेत. भारतासारख्या इतर देशांमध्ये परदेशी कंपन्या विस्तार करत आहेत अशी माहिती  फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष खलिद खान यांनी दिली.  


येत्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात वाढ होत राहील. इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPF) स्थापन करण्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रमात भारत सामील झाला आहे आणि या हालचालीमुळे आर्थिक संबंध वाढण्यास मदत होईल.


भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार अधिशेष


अमेरिका अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्यांच्याशी भारताचा व्यापार अधिशेष आहे. 2021-22 मध्ये भारताचा यूएससोबत 32.8 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष होता. मिळालेल्या आकडेवारीनुसार 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 मध्ये देखील भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार चीन होता.


चीनपूर्वी UAE हा देशाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता. 2021-22 मध्ये 72.9 अब्ज डॉलर्ससह संयुक्त अरब अमिराती भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता. त्यापाठोपाठ सौदी अरेबिया (42.85 अब्ज डॉलर ), इराक (34.33 अब्ज डॉलर ) आणि सिंगापूर (30 अब्ज डॉलर ) हे देश भारताचे व्यापारी भागीदार  देश आहेत.