मुंबई : युक्रेन-रशियाच्या युद्धाचे ढग भारतीय शेअर बाजारावर अधिक गडद झाले आहेत. आठवड्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी शेअर बाजारातल कालचीच मळभ पाहायला मिळाली. कामकाजाची सुरुवात घसरणीने झाली. भारतीय शेअर बाजारात मागील आठ सेशन्समध्ये मोठं अस्थिर वातावरण आहे.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज निर्देशांक सेन्सेक्स हा 800 हून अधिक अंकांच्या घसरणीसह खुला झाला. परिणामी निर्देशांक 55 हजारांखाली आला होता. तर निफ्टी देखील 238 अंकांनी कोसळला.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात अस्थिरतेचं वातावरण आहे. आज आशियाई शेअर बाजारही घसरण दिसत आहे. शांघाय, हँगसेंग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आज आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे.
प्री-ओपनिंगमध्येही बाजारात घसरण
आज बाजार सुरु होण्याच्या आधी म्हणजे प्री-ओपनिंग सेशनमध्ये बीएसईच्या सेन्सेक्समध्ये 700 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीही 100 अंकांनी कोसळला.
बाजार खुला झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे
शेअर बाजार खुला झाल्यानंतरही परिस्थिती सुधारताना दिसली नाही. सेन्सेक्स 580 अंकांच्या घसरणीसह 54,653 वर खुला झाला. त्यानंतर तातडीने तो आणखी कोसळला. 9 वाजून 20 मिनिटांनी सेन्सेक्स 744 अंकांनी कोसळून 54,358 अंक होता. त्यात आणखी वर ट्रेड करत आहे.
अशाचप्रकारे निफ्टीची सुरुवातही धीमी झाली. सुरुवातीला यात मोठ्या घसरणीची नोंद झाली. 9 वाजून 20 मिनिटांनी निफ्टी 216 अंक म्हणजेच 1.31 टक्क्यांनी कोसळला.
गुरुवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र झाल्याने संघर्षाच्या आठव्या दिवशी म्हणजेच काल (3 मार्च) सेन्सेक्स 366 अंकांनी कोसळून 55,102 च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 108 अंकांच्या घसरणीसह 16,498 वर बंद झाला. गुरुवारी सर्वाधिक घसणर ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये पाहायला मिळाली.