UK Inflation : अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्येही महागाईचा स्तर वाढू लागला आहे. ब्रिटनमध्ये जून महिन्यातील महागाई दर (Inflation Rate In UK) 9.4 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. हा महागाई दर मागील 40 वर्षातील सर्वाधिक महागाई दर आहे. बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ओएनएस) दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 ब्रिटनच्या सीपीआय निर्देशांकात 0.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, जून 2021 मध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. 


ओएनएसचे मुख्य अर्थ तज्ज्ञ ग्रॅण्ट फिट्जनर यांनी सांगितले की, इंधन दर आणि अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने महागाईत वाढ झाली आहे.  


जगातील प्रमुख सात अर्थव्यवस्थांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक महागाई ब्रिटनमध्ये नोंदवण्यात आली आहे. तर, जपान आणि कॅनडाचा महागाई दर अहवाल अद्याप जाहीर झाला नाही. मात्र, या देशांचाही महागाई दर ब्रिटनच्या महागाई दराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 


जून 2022 मध्ये परिवहन क्षेत्रासाठी वार्षिक वाढीचा दर 15.2 टक्के होता. तर, कोविड-19 लॉकडाउन दरम्यान जून 2020 मध्ये हा दर उणे 1.5 टक्के होता. ओएनएनने दिलेल्या माहितीनुसार, खाद्यान्न आणि अल्कोहोल वगळता असलेल्या पेयांच्या दरात जून 2022 पर्यंत 9.8 टक्क्यांनी वाढ झाली. मार्च 2009 नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. 


व्याज दरात वाढ


इंग्लंडची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने ऑक्टोबरमध्ये महागाई दर 11 टक्क्यांहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याशिवाय, ऊर्जा क्षेत्रातही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने आपले बेंचमार्क व्याज दर वाढवून 1.25 टक्के केला आहे. हा दर 2009 नंतरचा सर्वाधिक दर आहे.


बँक ऑफ इंग्लंडचे गर्व्हनर अॅण्ड्र्यू बेली यांनी सांगितले की, महागाई दर दोन टक्क्यांपर्यंत गाठवण्याचे आमचे लक्ष्य असून त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.