Tractor Purchase Subsidy : शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. आता हरियाणा सरकारनं (Haryana government) असाच एक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय. हरियाणा सरकार आता ट्रॅक्टर खरेदीवर 1 लाख रुपयांचं अनुदान देणार आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची आवश्यकता आहे, त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या अनुदानाचा लाभ घ्यावा
अलीकडच्या काळात शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. शेतीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर होत आहे. यातील काही ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सहज खरेदी करता येत असले तरी काही ट्रॅक्टर अजूनही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खरेदी करता यावी म्हणून हरियाणा सरकार मदत करत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या अनुदानाचा लाभ घ्यावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. याचा लाभ फक्त अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ कसा घेता येईल हे जाणून घेऊया.
ट्रॅक्टरवर एक लाख रुपये अनुदान
हरियाणा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग 45 HP आणि त्याहून अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरवर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देत आहे. यासाठी 26 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत शेतकरी विभागीय पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
निवड सोडतीद्वारे केली जाईल
प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची निवड गठित जिल्हास्तरीय कार्यकारिणीद्वारे ऑनलाईन सोडतीद्वारे केली जाईल, असे कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवड केल्यानंतर, निवडलेल्या शेतकऱ्यांना भारत सरकारने मान्यता दिलेल्या ट्रॅक्टर उत्पादकांशी वाटाघाटी करून त्यांच्या आवडीच्या उत्पादकाकडून ट्रॅक्टर खरेदी करावे लागेल. यासोबतच शेतकऱ्याला त्याच्या निवडलेल्या ट्रॅक्टरसह बिल, विमा, तात्पुरता क्रमांक, आरसी अर्ज फीची पावती आदी कागदपत्रे विभागीय पोर्टलवर अपलोड करावी लागतील.
कागदपत्रांची पडताळणी आवश्यक
शेतकऱ्यांना लाभ देण्यापूर्वी विभाग प्रत्यक्ष पडताळणी करेल. यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारिणीला ट्रॅक्टरच्या मूळ कागदपत्रांसह भौतिक पडताळणी सादर करावी लागणार आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, समिती पोर्टलवर फॉर्मसह पडताळणी अहवाल अपलोड करेल. त्यानंतर ते ईमेलद्वारे संचालनालयाला कळवेल. संचालनालय स्तरावर चौकशी केल्यानंतर शेतकऱ्यांना ई-व्हाऊचरद्वारे अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी कुठं अर्ज करावा?
कृषी विभागाच्या www.agriharyana.gov.in या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी याप्रमाणे अर्ज करू शकतात. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे उपसंचालक व सहायक कृषी अभियंता यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय 1800-180-2117 या टोल फ्री क्रमांकावरही माहिती मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या: