Adani Group And SEBI :  अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या एका अहवालामुळे मागील आठवडाभरापासून अदानी समूहाच्या शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. अदानी एटंरप्रायझेसच्या शेअर दराला मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवस सुरू असलेल्या घसरणीमुळे शेअर दरात जवळपास 70 टक्के घसरण झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये उडालेल्या हाहा:कारात गुंतवणूकदार होरपळून निघाले आहेत. अशातच सेबीच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सेबीमधील एक अधिकारी हे अदानी यांचे व्याही असल्याने कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला आहे.  

Continues below advertisement

अदानी समूहावर हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर गुंतवणुकादारांचे मोठे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि बाजारातील व्यवहाराचे नियमन करणाऱ्या सेबी सारख्या प्राधिकरणाकडून हालचाली सुरू नसल्याचा दावा करत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. खासदार महुआ मोइत्रा यांनी अदानी आणि सेबीच्या अधिकाऱ्यांमध्ये लागेबंध असल्याचा आरोप करत खळबळच उडवून दिली. या संबंधाच्या आडून हेराफेरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

खासदार महुआ मोइत्रा यांनी काय म्हटले?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले की, दिग्गज वकील सिरील श्रॉफ यांचा मी आदर करते. मात्र, त्यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानींच्या मुलासोबत झाला आहे. श्रॉफ हे सध्या कॉर्पोरेट गर्व्हर्नेंस अॅण्ड इनसायडर ट्रेंडिग बाबतच्या सेबीच्या समितीवर आहेत. जर, सेबी अदानी प्रकरणाची चौकशी करत असेल तर श्रॉफ यांनी सेबीच्या त्या समितीवरून तात्काळपणे पायउतार झाले पाहिजे, असेही मोइत्रा यांनी सांगितले. 

Continues below advertisement

सेबीच्या कारवाईवर प्रश्न

महुआ मोइत्रा यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे प्रमुख माधबी पुरी बुच यांना पत्र लिहून अदानी समूहाच्या संस्थांवरील नियामकांच्या चौकशीबाबत माहिती मागितली होती. मोईत्रा यांनी लिहिले की, 'अदानी ग्रुपच्या सीएफओच्या विधानाच्या आधारे असे दिसते की सेबीने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. अदानी ग्रुपने कोर्टात केस जिंकली असून त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला समजून घ्यायचे आहे की या प्रकरणाचा तपास कधी पूर्ण झाला? निष्कर्ष काय होते? काय कारवाई झाली? तुम्ही कोर्टात गेलात का? आदी प्रश्न मोइत्रा यांनी उपस्थित केले. 

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात काय म्हटले?

Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो, असे या अहवालात म्हटले. त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर अधिक असून मूल्यांकनापेक्षा सुमारे 85 टक्के अधिक दर आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या: