PM Suryodaya Yojana And Stocks : स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच 365 टक्क्यांचा परतावा देणारा स्टॉक्स आता आणखी सुस्साट पळण्याची शक्यता आहे. आधीच शेअर दरात आतापर्यंतचा सर्वाकालिक उच्चांक गाठलेला हा स्टॉक आता पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी केलेल्या घोषणेमुळे आणखी वधारण्याची शक्यता आहे.
सरकारी मिनीरत्न कंपनी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. IREDA ने नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपयांच्या इश्यू किमतीत IPO आणला होता आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये 29 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध झाला होता. IREDA चे शेअर्स शनिवार, 20 जानेवारी 2024 रोजी 148.85 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या IPO किमतीपेक्षा 117 रुपयांनी जास्त होते.
लिस्टिंगनंतर स्टॉकच्या दरात 365 टक्क्यांनी वाढ
दोन महिन्यांतील IREDA च्या शेअर दरावर नजर टाकल्यास, 2024 मध्येच स्टॉकमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एका आठवड्यात स्टॉक 34 टक्के आणि एका महिन्यात 42 टक्क्यांनी वाढला आहे. आणि लिस्टिंगपासून स्टॉक 365 टक्क्यांनी वधारला आहे.
PM मोदींनी कोणती घोषणा केली?
अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार 1 कोटी घरांवर छतावरील सौरऊर्जा बसविण्याच्या लक्ष्यासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली. घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर, IREDA ला होणार फायदा
अलीकडे IREDA ने पीएम कुसुम योजना (PM-KUSUM) योजना, रूफटॉप सोलर आणि इतर B2C क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी किरकोळ विभाग तयार केला आहे. IREDA च्या किरकोळ विभागाने कुसुम-बी योजनेअंतर्गत 58 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मोदी सरकारच्या १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याच्या योजनेचा फायदा IREDA ला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.)