नवी दिल्ली: जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे काही प्रमुख अधिकारी या आठवड्यात भारत दौरा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय आणि भारत सरकारमधील प्रमुख प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. ब्लूमबर्ग आणि रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. भारत देशामध्ये आपल्या कंपनीचा विस्तार करण्याच्या हेतूने ही भेट असेल अशी शक्यता मानली जात आहे. 


ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांचा चीनच्या बाहेर आपला व्यवसाय विविध घटकांमध्ये वाढण्याचा विचार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत देशामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी हेतू टेस्लाचे अधिकारी भारत सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. भारतातील उत्पादन घटकांच्या शक्यतांचा देखील विचार टेस्ला कंपनीनं केल्याची माहिती आहे.


एक वर्षापूर्वी टेस्लाला भारतात का 'ब्रेक'? 


टेस्ला कंपनीने जवळपास एक वर्षापूर्वीच भारतात आपला विस्तार करण्याचा विचार सोडून दिला होता, यामागे आयात कर जास्त असल्याचं कारण टेस्लानं पुढं केलं होतं. केवळ कंपनीकडूनच नव्हे तर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यावेळी भारतात आयात कर जास्त असल्याचं म्हटलं होतं. भारत सरकारने आयात शुल्क कमी करुन अमेरिका आणि चीनमध्ये असलेल्या टेस्लाच्या कार भारतात आयात करुन त्यात सूट द्यावी अशी मागणी त्यावेळी एलॉन मस्क यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मस्क यांनी त्यावेळी असं देखील म्हटलं होतं की, कंपनी अशा कोणत्याही आपला प्रकल्प उभारणार नाही ज्या ठिकाणी आधी आपल्या गाड्या विकता येतील आणि त्यांची सर्व्हिसिंगसाठी सोयीसुविधा उपलब्ध करु दिल्या जाणार नाहीत. यामुळेच केंद्र सरकारनं त्यांच्या अटी मान्य करणार नकार दिल्याची माहिती आहे.


कंपनीच्या शांघाय इथल्या प्लांटमधील गाड्या भारतात आणण्यास केंद्र सरकारनं साफ नकार दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर टेस्ला कंपनीला आयात शुल्क माफ केलं असतं तर भारतात गाड्यांच्या उत्पादन घेण्यासाठी टेस्ला कंपनी तयार होती आणि याच गोष्टीवरुन केंद्र सरकार आणि टेस्ला कंपनीमध्ये जो करार होणार होता तो फसला अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.


परंतू पुन्हा एका चीनच्या बाहेर एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयाला आलेला भारत देश टेस्लाला खुणावत असून, इथे व्यवसाय विस्तार करण्यासाठी मस्क उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. 


भारतीय बाजारपेठेपासून अंतर टेस्लासाठी नुकसान?


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारताला 5 ट्रिलयनची अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न आहे. याच अनुषंगाने टेस्ला जर भारतामध्ये त्यांचे उत्पादन किंवा त्याच्याशी निगडीत घटक बनवण्यासाठी तयारी झाली तर भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या पंतप्रधानांच्या योजनेशी ही गोष्ट सुसंगत असेल असं बोललं जात आहे. जर हा करार किंवा त्यादृष्टीनं पावलं पडली तर टेस्ला कंपनी आणि भारत सरकार यांच्यामध्ये ज्या गोष्टींचा अटकाव आहे तो दूर होण्यास मत होईल अशी अपेक्षा आहे. 


ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, या वृत्तासंदर्भात टेस्ला कंपनीनं याबाबत ई-मेलवर कोणताही प्रतिसाद दिला नाही. सोबतच केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अद्याप यावर कोणतंही भाष्य केलं नाही. 


भारतातील आव्हान?


टेस्ला आतापर्यंत त्यांच्या दृष्टिकोनामुळे भारतात प्रवेश करू शकली नाही, तर मर्सिडीज-बेंझ एजीसारखे काही जागतिक आव्हानकर्ते स्थानिक पातळीवर एकत्रित केलेल्या कार विकण्याच्या तयारीत आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या स्पर्धा करत आहेत. साहजिकच या परिस्थितीत टेस्लानं भारताकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर त्याचेच नुकसान होईल.