नवी दिल्ली : प्रवाशांना रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तात्काळ तिकीट बबुकिंग करायचं असल्यास ओटीपी वेरिफिकेशन करावं लागणार आहे. रेल्वे मंत्रालयानं तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवास करताना तिकिटांचं आरक्षण करावं लागतं. अनेकदा रेल्वेचं नियमित आरक्षण पूर्णपणे बुक झालेलं असल्यास तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय असतो. मात्र, काही जण सॉफ्टवेअरचा वापर करुन तात्काळ तिकीट बुकिंग करत असल्यानं काही सेकंदांमध्ये तात्काळ तिकीट बुकिंग संपल्यानं प्रवाशांना तिकीट मिळत नव्हती.
Tatkal Ticket Booking : तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम
पायलट प्रोजेक्ट म्हणून तात्काळ तिकीट बुकिंगमधील ओटीपी बेस्ड यंत्रणा 17 नोव्हेंबरला राबवण्यात आली होती. सुरुवातीला ही पद्धत काही ट्रेन्सच्या बुकिंगसाठी वापरण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या वाढवून 52 करण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये ही यंत्रणा सर्व ट्रेन साठी लागू करण्यात येईल असं सागण्यात आलं आहे.
प्रवाशांसाठी काऊंटर बुकिंग सुरक्षित बनवण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. नव्या यंत्रणेनुसार तात्काळ तिकीट बुकिंग काऊंटरवर करताना प्रवाशाच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. यानंतर ओटीपी पडताळणी केल्यानंतर तिकीट बुकिंग कन्फर्म होईल.
अधिकाऱ्यांच्या मते तात्काळ तिकीट बुकिंग यंत्रणेचा काही एजंटकडून गैरवापर केला जातो तो रोखण्यासाठी ओटीपी पडताळणी पद्धत सुरु करण्यात आली आहे. नव्या नियमामुळं पारदर्शकता, सुलभता आणि सुरक्षितता वाढेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
रेल्वेनं तिकीट बुकिंग करताना होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पाऊलं उचलली आहेत. जुलै महिन्यात तात्काळ तिकीट बुकिंगाठी युजरचं खातं आधार वेरिफाय असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आयआरसीटीसीच्या वेबाईटवरुन 1 ऑक्टोबर पासून आधार वेरिफाय खात्यावरुनच रेल्वेची सर्वसाधारण तिकीट बुक करता येतील, असा निर्णय घेण्यात आला.
तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी एसी आणी नॉन एसी क्लासच्या बुकिंगसाठी वेगळ्या वेळा आहेत. 3 टिअर एसी आणि 2 टिअर एसीच्या बुकिंची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरुवात होते. त्यानंतर 11 वाजता स्लीपर क्लासच्या तात्काळ तिकीट बुकिंगला सुरुवात होते.
तात्काळ तिकीट बुकिंग करताना सर्वसामान्य यूजर्सला तिकीट उपलब्ध होत नव्हती. याचं कारण काही सॉफ्टवेअरमध्ये प्रवाशांची माहिती अगोदरच भरुन ठेवलेली असते. बुकिंग सुरु होताच ते अपलोड करुन तिकीट बुकिंग होत असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग मधील नियमांतील बदलाचा फायदा प्रवाशांना होतो का ते पाहावं लागेल.