Main Rajaram : कोल्हापूरच्या इतिहासातील देदीप्यमान वारसा असलेल्या मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर होणार नाही, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. मेन राजारामचे स्थलांतर होऊ नये, यासाठी एबीपी माझाने पाठपुरावा केला होता. केसरकर यांनी निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली आहे.


केसरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे  भाविकांना व विशेष करून महिलांची गैरसोय होते. त्ंयामुळे अशा सुविधा मंदिरात देण्याचा आमचा मानस आहे.यासंदर्भात मी या भागात असलेल्या सर्व शासकीय इमारतींची पाहणी केली होती व मेन राजारामच्या ऐतिहासिक इमारतीस भेट दिली होती. या वास्तूमधील कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा  निर्णय घेण्यात आला असला, तरी ती सर्व कार्यालये शासकीय आहेत. त्याठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण करण्यात येतील. सदर कार्यालयांमध्ये मेन राजारामच्या इमारतीचा समावेश नाही. हायस्कूलच्य स्थलांतरास कोणत्याही प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाही. मी मेन राजारामला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांबाबत आवश्यक बाबींची नोंद घेतली आहे. विद्यार्थ्यांना वर्षभरात सुविधा उभारण्यात येतील. 


आयटी पार्क, क्रीडा संकुल, प्रशासकीय संकुल असे अनेक प्रकल्प कोल्हापूरमध्ये आणण्या चा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न आहे. शाहू मिलचे गतवैभव उभे करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. 


कोल्हापूरच्या वैभवात भरणारी वास्तू


मेन राजाराम ही फक्त वास्तू नसून तो कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. मेन राजारामची स्थापना 1870 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मेन राजाराममध्ये अनेक रथी, महारथी शिकले आहेत. त्यांनी फक्त देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवर आपल्या नेतृत्वाचा आणि संशोधनाचा ठसा उमटवला आहे. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, जागतिक किर्तीचे संशोधक जयंत नारळीकर असे दिग्गज या शाळेत शिकून मोठे झाले आहेत. अशा महनीय व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इमारतीवर काहींनी डोळा ठेवत यात्री निवास सुरु करण्याचा घाट घातला आहे.  





मेन राजाराममध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत? 


सध्या मेन राजाराममध्ये 772 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये सर्वाधिक 432 विद्यार्थीनी असून गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. मेन राजाराममध्ये शिकत असलेल्या सर्व मुली करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. ज्या मुलींची अडचण आहे, त्यांना शाळेकडून वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती परिसरात शाळा असल्याने अनेक मुलींना सुरक्षित वाटते. 


इतर महत्वाच्या बातम्या