Tata Group Market Cap : देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यवसाय समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहानं (Tata Group) एक नवीन विक्रम केला आहे. असा विक्रम आत्तापर्यंत इतर कोणत्याही उद्योग समूहानं केला नाही. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बनवणाऱ्या टाटा समूहाने शुक्रवारी 400 अब्ज डॉलरच्या भाग भांडवलाचा टप्पा गाठला आहे. हा आकडा गाठणारा टाटा समूह भारतातील पहिला व्यवसाय समूह ठरला आहे. देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह आणि अदानी समूहही (Adani Group) अद्याप या आकड्यापर्यंत पोहोचले नाहीत.
अंबानी दुसऱ्या तर अदानी तिसऱ्या क्रमांकावर
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप हे 277 अब्ज डॉलर आहे. हा समूह दुसऱ्या स्थानावर आहे. अदानी समूह 206 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील या तीन मोठ्या उद्योग समूहांची मार्केट कॅप 884 अब्ज डॉलर्स आहे. टाटा समूहाच्या 26 सूचीबद्ध कंपन्यांनी गेल्या एका वर्षात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं त्यांच्या मार्केट कॅपमध्ये 100 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. जूनपासून टाटा समूहाचे मार्केट कॅप 15.4 टक्क्यांनी वाढले आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तोपर्यंत तो अंदाजे 401 अब्ज डॉलर (33.6 लाख कोटी रुपये) झाला होता. जागतिक आर्थिक मंदी असतानाही टाटा समूहाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच चकित केलं आहे.
TCS चे बाजारमूल्य 190 अब्ज डॉलर
टाटा समूहाच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फायदा आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मुळे झाला आहे. टाटा समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये त्याचा हिस्सा सुमारे 47 टक्के आहे. TCS चे बाजारमूल्य 190 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. कंपनीच्या समभागांनी 4,422.45 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. TCS ची ही कामगिरी वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, माध्यम आणि दूरसंचार क्षेत्राच्या बळावर झाली आहे. जेपी मॉर्गनच्या मते, तिमाहीच्या शेवटी TCS च्या महसुलात वाढ झाली आहे. जेपी मॉर्गन यांनी टीसीएसला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. त्याची किंमत 4,600 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, अशी आशाही व्यक्त केली. जेपी मॉर्गन म्हणाले की, आम्हाला 2025-27 या आर्थिक वर्षात महसुलात 1 ते 2 टक्के वाढ अपेक्षित आहे.
टाटा समूहाचे शेअर्स तेजीत
TCS नंतर, टाटा समूहाची दुसरी सर्वात मोठी कंपनी टाटा मोटर्स देखील विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. ऑटोमोबाईल कंपनीच्या समभागांनी केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये 12 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. जग्वार लँड रोव्हरच्या आधारे टाटा मोटर्सचा नफा आणखी वाढेल. टाटा समूहाला टायटन आणि टाटा स्टीलसारख्या कंपन्यांचाही फायदा झाला आहे. टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये या चार कंपन्यांचा हिस्सा सुमारे 75 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या: