Crop Insurance : नैसर्गिक आपत्तींमुळं जर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान (Damage to crops) झालं तर त्याला सुरक्षा कवच म्हणून पिक विमा ( Crop Insurance) दिला जाते. मात्र, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) अद्यापही 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील पिक विम्याची मंजूर रक्कम मिळाली नाही. त्यामुळं स्वतंत्र भारत पक्षाने (Swatantra Bharat Paksh) आणि  शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिक घेतलीय. शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून पुणे (Pune) येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  येत्या 9 सप्टेंबर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र भरातून शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली.  


महाराष्ट्रातील 21 लाख 45 हजार 665 शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची रक्कम मिळाली नाही


महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली मात्र खोट्या आश्वासन पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याचे घनवट म्हणाले. महाराष्ट्रातील 21 लाख 45 हजार 665 शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची थकीत रक्कम विमा कंपनीकडून येणे बाकी आहे. ही थकीत रक्कम 2306 कोटी रुपये असून ती सरकारकडून कंपनीला देण्यात आली तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते. 


पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास...घनवटांचा इशारा


गेली दीड वर्ष शेतकरी आशेने वाट पहात आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाही. सरकारी अधिकारी व कंपन्यांनी दिलेली आश्वासने व तारखा खोट्या ठरल्यामुळे पुन्हा शासनाचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली आहे. सरकारनं तातडीने पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.


कसा असेल मोर्चाचा मार्ग


दरम्यान, येत्या 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12  वाजता, पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. अलंकार टॉकीज चौक, साधू वासवानी चौक मार्गे सेंटर बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयावर जाईल. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणे बाकी आहे, त्यांनी मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, स्व.भा पक्ष प्रदेशाध्यक्ष, मधुसूदन हरणे, स्व.भा. पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Crop insurance: पावसाने नुकसान झाल्यास, विमा कंपनीकडे कशी कराल तक्रार? ऑनलाइन तक्रारीची A to Z प्रक्रिया पहा इथे