Stock Market Opening: आज शेअर बाजारात (Stock Market) ओपनिंगला काही प्रमाणात पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी झालेल्या घसरणीपेक्षाही गॅप डाऊन ओपनिंग झाली आहे. आज बँक निफ्टी (Bank Nifty) देखील 229 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत असून तो 40,000 च्या खाली पोहोचला आहे. दरम्यान, बाजार उघडल्यानंतर 5 मिनिटांत सेन्सेक्समधील घसरण कव्हर झाल्याचं पाहायला मिळालं आणि सेन्सेक्समध्ये रिकव्हरी दिसून आली.


बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांच्या आत रिकव्हरी 


आज बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीनं वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. बाजार उघडल्यानंतर काहीसा घसरलेला सेन्सेक्स नंतर सावरल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स 266.82 अंकांच्या म्हणजेच, 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 59,597.72 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 85.50 अंकांच्या म्हणजेच, 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 17,689.85 वर व्यवहार करत आहे. 


बाजाराची सुरुवात कशी होती? 


आज बाजाराच्या सुरुवातीला बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 229.21 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 59,101.69 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.40 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी घसरून 17,541.95 वर उघडला.


सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती


सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि निफ्टीच्या 50 पैकी 25 निफ्टी शेअर्समध्ये घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


आज कोणत्या सेक्टर्समध्ये पडझड? 


आज बँकिंग क्षेत्राव्यतिरिक्त, वित्तीय सेवा, मीडिया, फार्मा, हेल्थकेयर, कंज्यूमर ड्यूरेबल्स आणि ऑईल आणि गॅस सेक्टर्समध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय ऑटो, आयटी, मेटल, पीएसयू बँक, रिअल्टी शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे.


प्री-ओपनिंगमध्ये काय होती परिस्थिती? 


बाजार सुरू होण्यापूर्वी प्री-ओपनिंगमध्ये बाजारात घसरण दिसून आली. BSE सेन्सेक्स 255.09 अंकांनी म्हणजेच, 0.43 टक्क्यांनी घसरून 59075.81 वर ट्रेड करत होता. तर, NSE चा निफ्टी 40.90 अंकांनी म्हणजेच, 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 17563.45 वर ट्रेड करत होता.