Share Market Opening On 05th April: शेअर बाजारात सोमवारी असलेली तेजी मंगळवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा 174 अंकांनी वधारला. प्री-ओपनिंगमध्ये सकारात्मक संकेत दिसून आले. सोमवारी अमेरिकन शेअर बाजारही वधारत बंद झाला होता. तर आशियाई शेअर बाजारातही तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला होता. मात्र, नफा वसुली सुरू झाल्याने तेजीला ब्रेक लागला.
सेन्सेक्स आज 60,786 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 27 अंकांनी वधारत 18080 अंकांवर सुरू झाला. आज व्यवहार सुरू झाला तेव्हा निफ्टीतील 50 पैकी 27 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 23 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्समध्ये तेजी तर 15 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये नफा वसुली दिसून आली. बँक निफ्टीत 283 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 38,419 अंकावर व्यवसाय करत आहे.
निफ्टीमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर्समध्ये 1.64 टक्के, सन फार्मामध्ये 1.47 टक्के, मारुती 1.35 टक्के, टीसीएस 1.07 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.95 टक्के, एनटीपीसीमध्ये 0.87 टक्के. टेक महिंद्रा 0.81 टक्के आणि एचयूएलमध्ये 0.72 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
सोमवारी बाजारात तेजी
शेअर बाजारात सोमवारी दिवसभर तेजी राहिली. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीत तेजी दिसून आली होती. बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. सेन्सेक्सने आज 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 18 हजारांचा टप्पा ओलांडला.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीने या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजे 2.25 टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्स 60,611.74 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 382.90 अंकांनी म्हणजे जवळपास 2.17 टक्क्यांनी वधारला. आज 18,053.40 अंकांवर बंद झाला.