ITR Filling : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. आज ITR भरला नाही तर करदात्यांना पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्राप्तीकर परतावे दाखल करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढत आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेपर्यंत 53 लाख प्राप्तीकर परतावे दाखल झाले आहेत. शेवटच्या एका तासात तब्बल चार लाख 95 हजार प्राप्तीकर परतावे दाखल झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आज इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरला तर 31 डिसेंबर 2022 पर्यंत देखील भरता येईल. परंतु, त्यासाठी करदात्यांना पाच हजार रूपयांचे विलंब शुल्क भरावे लागेल. तर पाच लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना हे विलंब शुल्क एक हजार रूपये असणार आहे. विलंब शुल्क भरण्यापेक्षा करदात्यांकडून मोठ्या संख्येने शेवटच्या दिवशी प्राप्तीकर परतावे दाखल केले जात आहेत.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये 53,98,348 आयटीआर दाखल करण्यात आले असून गेल्या एका तासात 4,95,505 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. तर आज तब्बल 43,99,038 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.
विलंब शुल्क टाळायचे असेल तर आजच्या आजच इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्या, असे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, आयकर विभागाने दिलेल्या वेळेत प्राप्तीकर रिटर्न भरले नाही तर करदात्यांवर कारवाई होऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो. कायद्यातील तरतुदीनुसार दंडाची रक्कम नाही भरल्यास तीन महिने ते दोन वर्षांपर्यंतचा तुरूंगवास होऊ शकतो.