मुंबई : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक स्वप्न पूर्ण करता येतं. पण त्यासाठी सातत्य लागतं. कष्ट लागतात. दिवस रात्र एक करून आज कोट्यधीश झालेल्या लोकांच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आयुष्यात कितीही संकटं आली तरी न डगमगता अब्जाधीश होणाऱ्या या उद्योजकाची कथा फारच कमी लोकांना माहिती असेल. त्यांनी आयुष्याच्या उत्तराधार्थ मोठं साम्राज्य उभं केलंय. सध्या त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांची भारतासह विदेशातही निर्यात केली जाते. या उद्योगपतीचं नाव आहे लक्ष्मण दास मित्तल.


इंग्रजीत केलं एमए


त्यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात एलआयसी एजंट म्हणून काम केले. निवृत्त झाल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी सुखी जीवन जगण्यापेक्षा त्यांनी खडतर मार्गावरून चालत सोनालिका ग्रुपची स्थापना केली. आज ही कंपनी देशातील क्रमांक एकची एक्सपोर्ट कंपनी आहे. सध्या लक्ष्मण दास मित्तल हे 93 वर्षांचे आहेत. त्यांनी शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी इंग्रजीमध्ये एमए केलं. 


दिवाळखोरीचा करावा लागला सामना


शिक्षण झाल्यानंतर 1955 मध्ये त्यांनी एलआयसी एजंट म्हणून काम चालू केलं. पुढे एलआयसी एजंटचं काम करता-करता त्यांनी आपल्या गावातच सोनालिका नावाने थ्रेशर्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. मात्र या व्यवसायात त्यांना अपयश आले. या व्यवसायात त्यांना एवढा तोटा झाला की 1970 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न हे एक लाख रुपायांपर्यंत खाली आले होते. दिवाळखोरीत गेल्यानंतर त्यांनी चरितार्थासाठी अनेक कामे केली. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. 1995 सालानंतर त्यांना खरं यश आलं. त्यांनी सोनालिका ग्रुपअंतर्गत ट्रॅक्टर्सची निर्मिती करण्याचं ठरवलं. 1996 साली त्यांच्या पहिल्या ट्रॅक्टरची विक्री झाली.


आज आहे क्रमांक एकची एक्सपोर्टर कंपनी


या कंपनीने पुढे अगदी कमी काळात मोठी प्रगती केली. या कंपनीने तयार केलेल्या ट्रॅक्टर्सची मागणी वाढू लागली. आजघडीला अल्जेरियामध्ये या कंपनीच्या ट्रॅक्टर्सची हिस्सेदारी 50 टक्के आहे. नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये ट्रॅक्टर्स विक्रीच्या बाजारात या कंपनीचा हिस्सा 20 टक्के आहे. भारतातील बाजारात या कंपनीचा हिस्सा 10 टक्के आहे. या कंपनीकडून 150 पेक्षा अधिक देशांत ट्रॅक्टर्स तसेच इतर उपकरणांची निर्यात केली जाते. 


मित्तल आज आहेत अब्जाधीश 


आजघडीला लक्ष्मण दास मित्तल हे अब्जाधीश आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची संपत्ती ही 2.9 अब्ज डॉलर्स (जवळपास 24,000 कोटी रुपये) आहे. आज त्यांची मुलं अमृत सागर आणि दीपक मित्तल त्यांच्या कंपनीचा कारभार पाहतात. मित्तल यांचे नातू सुशांत आणि रमन यांनीदेखील या कंपनीचा कारभार पाहायला सुरुवात केली आहे. 


हेही वाचा :


एकही रुपया न देता आधारकार्ड अपडेट करता येणार, नेमकं कसं? जाणून घ्या..


EPF क्लेम स्टेटस नेमकं कसं चेक करायचं? समजून घ्या सोप्या शब्दांत!


चार नवे आयपीओ येणार, मालामाल होण्याची नामी संधी; पैसे गुंतवण्याआधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!