Sleeper Vande Bharat Express : देशातील अव्वल तंत्रज्ञान असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नवीन आवृत्ती लवकरच येणार आहे. भारतीय रेल्वे पुढील वर्षी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच चांगली असणार आहे. या ट्रेनमुळं विमानांची क्रेझही कमी होईल, असं बोललं जात आहे. जाणून घेऊयात या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसबद्दल सविस्तर माहिती.
ताशी 200 किमी वेगानं धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही जागतिक दर्जाच्या ट्रेन्सपैकी एक असेल. ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन असणार आहे. अपग्रेड केलेल्या ट्रॅकमुळं ही ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावेल. यामुळं प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणं शक्य होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रथम सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.
या ट्रेनमुळे विमानांची क्रेझही कमी होऊ शकते
वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता इतकी आहे की ती राजधानी एक्सप्रेस ट्रेनला मागे सोडू शकते. वंदे भारत एक्सप्रेस इतर गाड्यांपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. त्याचबरोबर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आकर्षित करण्याची शक्यता आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये काय?
नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये 823 जागा सीट असणार आहेत. या ट्रेनमध्ये एकावेळी 823 प्रवासी प्रवास करु शकतील. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण 16 डबे असणार आहेत. ज्यामध्ये एक एसी- 1, चार एसी -2 आणि 11 एसी 3 वर्ग डबे असणार आहेत. सर्व डब्यांमध्ये मिनी पॅन्ट्री आणि तीन शौचालये असतील. आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही ट्रेन जागतिक दर्जाची असेल. ही ट्रेन भारतातील 24 राज्यांना जोडेल आणि 33 मार्ग कव्हर करेल.
भविष्यात या ट्रेनचा वेग 220 किलोमीटर असणार
रेल्वे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी काळात यात आणखी सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा वेग ताशी 220 किलोमीटर असेल. सध्या त्याची रचना ताशी 220 किलोमीटरच्या कमाल वेगासाठी केली जात आहे. या वेगाने ट्रेन लांब पल्ल्यासाठी धावेल. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळं प्रवासाचा वेळ 25 ते 45 टक्के कमी होईल.
महत्त्वाच्या बातम्या: