Hurun India Philanthropy List 2023: देशातील 119 उद्योगपतींनी 2022-23 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक देणग्या दिल्या आहेत. या सर्वांच्या देणग्या जोडल्या तर ही रक्कम 8445 कोटी रुपये होते. शिव नाडर यांन 2 हजार 42 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ते देशातील सर्वात मोठे देणगीदार बनले आहेत. तर अझीम प्रेमजी (Azim Premji) दुसऱ्या स्थानावर आहेत.


शिव नाडर हे देशातील आघाडीची IT कंपनी HCL Technologies चे संस्थापक अध्यक्ष आहेत. सर्वात मोठे परोपकारी म्हणून ते उदयास आले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात शिव नाडर यांनी 2042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 76 टक्के अधिक आहे.


शिव नाडर यांच्यानंतर विप्रोचे अझीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर 


बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, EdelGive Hurun India Philanthropy List 2023 नुसार, शिव नाडर 2042 कोटी रुपयांची देणगी देऊन देशातील सर्वात परोपकारी बनले आहेत. 2022-23 आर्थिक वर्षात त्यांनी दररोज सरासरी 5.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. शिव नाडर यांच्यानंतर विप्रोचे अझीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 2022-23 मध्ये एकूण 1774 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जे 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 267 टक्के अधिक आहे.


मुकेश अंबानी देणगीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर


रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देणगीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 376 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. झिरोधा येथील निखिल कामथ हा सर्वात तरुण देणगीदाता ठरला आहे. तो 12व्या स्थानावर असून त्याने 112 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.


महिला देणगीदारांमध्ये रोहिणी नीलेकणी पहिल्या क्रमांकावर


महिला देणगीदारांमध्ये रोहिणी नीलेकणी पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी 170 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. EdelGive Hurun India Philanthropy List 2023 नुसार, त्या 10 व्या क्रमांकावर आहे. रोहिणी नीलेकणी व्यतिरिक्त, इतर सेवाभावी महिलांची नावे पाहिल्यास, अनु आगा आणि लीना गांधी यांनी 23 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या दोघी 40व्या आणि 41व्या स्थानावर आहेत. एकूण देणगीदारांपैकी 7 महिला देणगीदात्या आहेत.


शिव नाडर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर


शिव नाडर हे प्रथम क्रमांकाचे परोपकारी आहेत. परंतू, फोर्ब्स 2023 च्या यादीनुसार ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. अझीम प्रेमजी देणगीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण श्रीमंतांच्या यादीत ते 11.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 17 व्या क्रमांकावर आहेत. देणगीच्या बाबतीत मुकेश अंबानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या मते, ते 92 अब्ज डॉलर्ससह देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. निखिल कामथ देणगीच्या बाबतीत 12 व्या स्थानावर आहे, जरी तो श्रीमंतांच्या यादीत 40 व्या स्थानावर आहे. अनु आगा देणगीत 40व्या स्थानावर आहेत तर श्रीमंतांच्या यादीत त्या 87व्या स्थानावर आहेत.


चालू वर्षात 119 उद्योगपतींनी 5 कोटीहून अधिक रुपयांच्या देणग्या दिल्या


2022-23 या आर्थिक वर्षात 119 उद्योगपतींनी 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक देणग्या दिल्या आहेत. या सर्वांच्या देणग्या जोडल्या तर ही रक्कम 8445 कोटी रुपये होते. ही रक्कम 2021-22 च्या तुलनेत 59 टक्के अधिक आहे. 2022-23 मध्ये, 14 भारतीयांनी 100 कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे, जी मागील वर्षी फक्त 6 होती. तर 12 जणांनी 50 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 47 जणांनी 20 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक, आज जगातील पाचव्या क्रमाकांचा श्रीमंत व्यक्ती