Share Market Crash : भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले. आज प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 1100 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीत 324 अंकांची घसरण दिसून आली.
भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेल्या घसरणीनंतर शेअर बाजारावर विक्रीचा मोठा दबाव असल्याचे संकेत आहेत. सकाळी 9.18 वाजता शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 1331 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. त्यावेळी सेन्सेक्स 52940 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. त्याशिवाय, निफ्टीमध्ये 385 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी 15813 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता.
वाढत्या महागाईचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेत विक्रमी महागाई नोंदवण्यात आल्यानंतर शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात पडझड झाली होती. त्याशिवाय, आज SGX NIFTY मध्ये व्यवहाराची सुरुवात गॅप डाऊनने झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
सेन्सेक्समधील टॉप 30 स्टॉक्सपैकी फक्त दोन शेअर्समध्ये खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, उर्वरित 28 स्टॉकच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. टाटा मोटर्स, एचडीएफसी, विप्रो, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे शेअ४स तीन टक्क्यांहून अधिक दराने घसरले आहेत.
रुपयाची विक्रमी घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 78.20 रुपये इतके झाले आहे. पहिल्यांदाच रुपयांने इतका नीचांकी दर गाठला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा
परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे. FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.