Share Market Opening : शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 447 अंकांची आणि निफ्टीमध्ये 82 अंकाची घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केली. आज भारताच्या जीडीपीचे आकडे समोर येणार आहेत. जीडीपीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


आज शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स 300 अंकांच्या घसरणीसह 55622 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टीत 82 अंकांची घसरण होत 16578 अंकांवर खुला झाला. 


शेअर बाजारातील बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा आदी सेक्टरमध्ये नफावसुली सुरू असून विक्रीचा जोर आहे. तर, ऑटो, एनर्जी, रिअल इस्टेट सारख्या सेक्टरमध्ये किंचींत तेजी दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 16 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली असून 34 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. तर, सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 5 शेअरमध्ये तेजी असून 25 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. 


आज महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.89 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 1.55 टक्क्यांनी वाढ झाली. टाटा स्टीलच्या दरात 0.82 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.26 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.20 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 0.18 टक्के, एल अॅण्ड टीमध्ये 0.09 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.


सोमवारी खरेदीचा जोर


गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेला शेअर बाजार सोमवारी चांगलाच वधारला होता. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी उसळण दिसून आली.  सोमवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1041 अंकांनी, तर निफ्टीही  308 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.90 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,925 वर बंद झाला. तर,  निफ्टीमध्ये 1.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,661 वर बंद झाला. आयटी, रिअॅलिटी, ऑइल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही दोन टक्क्यांची वाढ दिसून आली.