Delhi Heavy Rain : दिल्लीमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. यावेळी ताशी 100 किमी वेगाने वारे वाहत होता. या मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात नुसान झालं आहे. वादळी पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत शिवाय अनेक भागात पाणी साचलं आहे. दिल्लीत मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनके ठिकाणी पाणी साचलं असून वादळामुळे अनेक झाडंही पडली आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.


दिल्लीत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. जामा मशीद परिसरातील कमल या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कमल आपल्या घराच्या गच्चीत फिरत असताना जोरदार वादळामुळे छताचा काही भाग कोसळून त्यांच्या अंगावर पडला. तर उत्तर दिल्लीतील अंगूरी बाग भागात वादळामुळे पिंपळाचं झाड अंगावर पडून बसीर बाबा नावाच्या 65 वर्षीय बेघर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीत वादळ आणि मुसळधार पावसामुळे जामा मशिदीच्या घुमटाचंही नुकसान झालं आहे. जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी सांगितले की, एका मिनारातून आणि मशिदीच्या इतर भागातून दगड पडल्यानं दोन जण जखमी झाले आहे. मुख्य घुमटाचा कलश तुटला असून अधिक नुकसान टाळण्यासाठी दुरुस्ती करणं आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या मदतीने मशिदीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहीणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


मुसळधार पावसामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यादरम्यान अनेक वाहनं अडकली. बहुतांश वाहनचालकांना समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रास सहन करावा लागला. दिल्लीच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलं, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळामुळे दिल्लीत 294 झाडं पडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.


हवामानातील बदलामुळे अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर वादळी वारे आणि पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसानंतर दिल्लीतही अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांकडून सतत ट्रॅफिक अलर्ट जारी करण्यात आले होते.


दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनीही ट्विट करून लिहिले की, वादळानंतर अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी भेटी दिल्या. लोकांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीनं झाडं हटवून रस्ते मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या