Share Market Crash : आज भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स  850 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीतही 250 हून अधिक अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. 


गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर, आशियाई शेअर बाजारात पडझड सुरू आहे. हँगसेंग निर्देशांक 4 टक्क्यांनी कोसळला आहे. जागतिक स्तरावरही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशातील मध्यवर्ती बॅंकांकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत.


आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 773.94 अंकानी म्हणजे जवळपास 1.39 टक्क्यांची घसरला. सेन्सेक्स आज 54,928.29 अंकावर सुरू झाला. सेन्सेक्स 55 हजार अंकाच्या खाली घसरला आहे. 


निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याने शेअर दर घसरला आहे. शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणावर विक्रीचा सपाटा सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत.  बँकिंग शेअरमध्येदेखील घसरण सुरू आहे. बँक निफ्टीमध्ये 637.35 अंकाची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 34595 या अंकाच्या पातळीवर व्यवहार करत आहे.  बँक निफ्टीतील सर्व 12 स्टॉक्समध्ये घसरण सुरू आहे. 


शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण दिसत आहे. आयटी, बँकिंग शेअरमध्येही घसरण दिसत आहे. रियल्टी शेअरमध्ये 3 टक्क्यांनी घसरला आहे. आयटी क्षेत्रात 2.44 टक्क्यांची घसरण दिसत आहे.  मेटलमधील स्टॉकमध्ये 2.3 टक्क्यांची घसरण दिसत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या स्टॉकमध्ये 2.57 टक्क्यांची घसरण दिसत आहे. 


टाटा मोटर्समध्ये 4.1 टक्के आणि एचसीएल टेक 3.87 टक्क्यांची घसरण दिसत आहे. विप्रोच्या शेअर दरात 3.29 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यूपीएलमध्ये 3.19 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 3.16 टक्क्यांची घसरण झाली आहे.


दरम्यान, गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 600  अंकानी वधारला होता. मात्र, बाजार बंद होईपर्यंत विक्रीचा जोर वाढला होता. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 55,702 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी निर्देशांक 16,671 वर बंद झाला.