Share Market : आज गुरुवारी, शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. ओपनिंग ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. जागतिक शेअर बाजारातही नकारात्मक वातावरण असल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. बुधवारी अमेरिकन बाजारातील तीन प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली होती. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारावर दिसून आले. 


आज सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. सेनसेक्स 494.77 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 150.70 अंकांनी घसरून 17,094 अंकांवर सुरू झाला. युक्रेन-रशिया युद्ध थांबत नसल्यानं देखील जागतिक स्तरावरील एक्सचेंजमध्ये पडझडीचे सत्र सुरुच आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे. 


सकाळी 9.30 वाजता बाजाराची काय स्थिती?


सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स सावरताना दिसून येत असून  187.62 अंकांच्या म्हणजे 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 57,497 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी 17200 च्या जवळ व्यवहार करत आहे.


बँका, रिअल इस्टेट, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात  घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मीडिया सेक्टर 5 टक्क्यांनी वधारला आहे. कोल इंडिया, हिंदाल्को, आयटीसी आणि ओएनजीसीच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, कोटक बँकमध्ये 3.27 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टायटनमध्ये घसरण झाली आहे. 
 


बुधवारी कसा होता शेअर बाजार? 


सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 304 अंकांनी तर निफ्टीही 69 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,684 अंकावर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,245 अंकावर पोहोचला. 



बुधवारी 1424 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1891 शेअर्समध्ये घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.