Share Market FPI : भारतीय बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPIs) माघार सलग आठव्या महिन्यात सुरुच आहे.  यूएस मध्यवर्ती बँकेने दर वाढवण्याच्या भीतीने विदेशी गुंतवणुकदारांकडून विक्री सुरू आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 40,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, 2022 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 1.69 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.


प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महिन्यात भारतीय शेअर बाजारातून एकूण 39,993 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. भारतीय बाजारातील कमकुवतपणाचे प्रमुख कारण म्हणजे एफपीआयकडून ही माघार असल्याचं बोललं जात आहे.


यापुढे गुंतवणूकदारांचा कल कसा असेल? 


भू-राजकीय तणाव, उच्च चलनवाढ, केंद्रीय बँकांकडून आर्थिक धोरण कठोर केल्यामुळे, FPI गुंतवणूक यापुढे अस्थिर राहील असा अंदाज कोटक सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चचे (रिटेल) प्रमुख  श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केला आहे. 


तर,  यूएस मध्यवर्ती बँकेकडून अधिक आक्रमक दरवाढीच्या भीतीमुळे एफपीआयच्या विक्रीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हने या वर्षी दोनदा धोरणात्मक दर वाढवले आहेत. या निर्णयाचा परिणाम बाजारावर जाणवत असल्याचे मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च, हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे


याशिवाय रशिया-युक्रेन युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार गोंधळलेले आहेत. युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. यूएस सेंट्रल बँकेने धोरणात्मक दरात वाढ केल्याने, जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांनी आर्थिक धोरण कडक केल्यामुळे आणि परकीय चलन डॉलरच्या दरात झालेली वाढ यामुळे परकीय गुंतवणूकदार संवेदनशील बाजारात विक्री करत आहेत असं बीडीओ इंडियाचे मनोज पुरोहित यांचं मत आहे 


8 महिन्यांत 2.07 कोटी काढले


ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या आठ महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2.07 लाख कोटी रुपये काढले आहेत. आता एफपीआय विक्री मंदावली आहे. जूनच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांची विक्री खूपच कमी झाली आहे. डॉलर आणि यूएस बॉण्ड्सवरील उत्पन्न स्थिर झाल्यास एफपीआयची विक्री थांबू शकते असं  जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही.के.विजयकुमार यांचे विश्लेषण आहे.