मुंबई : नरेंद्र मोदी (Narenda Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताला वेगवेगळ्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी सरकारी धोरणं राबवण्यात आली. संरक्षण क्षेत्रालाही स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी केल्या. त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण संरक्षणाच्या बाबतीत चांगली प्रगती केली आहे. भारताच्या याच धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनाही फार फायदा झाला आहे. अशाच एक कंपनीच्या शेअरचे मूल्य तर थेट 500 टक्क्यांनी वाढलेले आहे. 


संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या झेन टेक्नॉलोजिस लिमिटेड या कंपनीने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 500 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी संरक्षण क्षेत्रात काम करते. या कंपनीकडून एक अँटी-ड्रोन सिस्टिम तयार केली जाते. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने ओडिशा राज्यातील गोपालपूर येथे आर्मी एअर डिफेन्स कॉलेजची एक ऑर्डर पूर्ण केली आहे.  याच कारणामुळे शुक्रवारी या कंपनीने भांडवली बाजार चालू असताना गुंतवणूकदारांना एका दिवसात 9 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. सध्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य 971 रुपये आहे. 


500 टक्क्यांची वाढ 


झेनटेक्नॉलॉजिस या कंपनीच्या शेअरबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या दोन वर्षांत तो 500 टक्क्यांनी वाढलेला आहे. चार वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,750 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. एका महिन्यात या स्टॉकमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी या कंपनीच्याशेअरचे मूल्य 188 होते. आता हे शेअर 971 रुपयांपर्यंत वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या कंपनीत 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज याच दहा हजार रुपयांचे 50 हजार रुपये झाले असते. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा देशात एनडीएची सत्ता आली आहे. त्यामुळे यावेळी संरक्षण क्षेत्राशी संबंधित कोणकोणते निर्णय घेतले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानुसारच  संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी अवलंबून असेल.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


Gold Silver Rate : अवघ्या 12 तासांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी घट, नेमकं कारण काय?


बँक खात्यावर 200 रुपये येतात अन् होते हजारोंची लूट, नवा स्कॅम आहे तरी काय? कशी काळजी घ्याल?


नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, 2 महिन्यातच ऑनलाईन आंबा विक्रीतून शेतकरी लखपती