मुंबई : येत्या 23 जुलै रोजी केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प मांडणार आहे. सरकार यावेळच्या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतुदी असणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याचाच परिणाम सध्या शेअर बाजारावर पाहायला मिळतोय. सध्या अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी तसेच आर्थिक भांडवल उभं करण्यासाठी स्वत:चा आयपीओ घेऊन येत आहेत. या आठवड्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ आयपीओ येणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवण्याची चांगली संधी चालू आली आहे. 
या आठड्यात मेनबोर्ड श्रेणीतील आयपीओ येत नाहीयेत. येणारे आठही आयपीओ हे एसएमई क्षेत्रातील आहेत. येणाऱ्या आठ आयपीओंमध्ये आरएनएफआय सर्व्हिसेस , एसएआर टेलीव्हेंचर, व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक, व्हीएल इन्फ्राप्रोजेक्ट्स, मंगलम इन्फ्रा अँड इंजीनिअरिंग, चेतना एज्यूकेशन, अप्रमेय इंजीनिअरिंग आणि क्लिनिटेक लॅबोरेटरी या आयपीओंचा समावेश आहे. 


अनेक कंपन्या आयपीओ आणण्यासाठी उत्सूक


पॅन्टोमॅथ कॅपिटल अॅडव्हायजर्सच्या मतानुसार सध्या भारतीय भांडवली बाजार चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक पातळीवर सध्या स्थिरतेचे वातावरण आहे. त्याचाच परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या कंपन्यांना आपले आयपीओ घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाईत अनेक आयपीओ यशस्वी ठरलेले आहेत. कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठी रक्कम उभी केलेली आहे. याच कारणामुळे सध्या अनेक कंपन्या आपला आयपीओ घेऊन येण्यास उत्सुक आहेत. या आठवड्यात आठ आयपीओंसह आठ कंपन्यादेखील शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत.  


येणार एकूण आठ आयपीओ 


मिळालेल्या माहितीनुसार आरएनएफआय सर्व्हिसेस आणि एसएआर टेलीव्हेंचर हे एसएमई आईपीओ 22 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील. तर 24 जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत पैसे गुंतवता येतील. आरएनएफआय या कंपनीने आपल्या आयपीओचा किंमत पट्टा 98-105 रुपये एवढा ठेवला आहे. या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला एका लॉटमध्ये 1200 शेअर्स खरेदी करावे लागतील. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला एकूण 70.81 कोटी रुपये उभे करायचे आहेत. एसएआर  टेलिव्हेंचरने आपल्या आयपीओसाठी  200-210 रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. या कंपनीत गुंतवणूक करायची अशेल तर एका लॉटमध्ये तुम्हाला 500 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. एसएआर ही कंपनी आपल्या आयपीओतून 150 कोटी रुपये उभे करणार आहे. 


23 जुलैला दोन आयपीओ


येत्या 23 जुलै रोजी व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक आणि व्हीएल इन्फ्राप्रोजेक्ट्स हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होतील. येत्या 25 जुलैपर्यंत तुम्हाला या आयपीओंत गुंतवणूक करता येईल. व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक या कंपनीने आपली्या आयपीओचा किंमत पट्टा 91-93 एवढा निश्चित केला आहे.  व्हीएल इन्फ्राप्रोजेक्ट्सने शेअरचे मूल्य 39-42 रुपये प्रति शेअर एवढे ठेवले आहे.


24 जुलै रोजी दोन आयपीओ येणार


यासह मंगलम इन्फ्रा आणि चेतना एज्यूकेशन हे दोन आयपीओ येत्या 24 जुलै रोजी खुले होणार आहेत. मंगलम इन्फ्राच्या शेअरचा किंमत पट्टा 53-56 रुपए असेल. ही कंपनी आयपीओतून 27.62 कोटी रुपये उभे करणार आहे. तर चेतना एज्यूकेशन आयपीओतून एकूण 45.9 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 80-85 रुपये आहे.


दरम्यान, या आठवड्याचा शेवटीदेखील दोन एसएमई सेगमेंटमधील आयपीओ दाखल होतील. या आयपीओंची नावे अप्रमेय इंजीनिअरिंग आणि क्लिनिटेक लॅबोरेटरी अशी आहेत. 15 जुलै रोजी ते खुले होतील. अप्रमेयचा किंमत पट्टा 56-58 रुपये तर क्लिनिकल लॅबोरेटरी या आयपीओच्या प्रत्येक शेअरचे मूल्य 96 रुपये असेल.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


इमर्जन्सी फंड उभा करायचाय, पण कसा करू समजत नाहीये? सोप्या भाषेत समजून घ्या 67:33 सूत्राची जादू!


बम्पर रिटर्न्स देणारे स्टॉक्स हवे आहेत? ही घ्या यादी; मिळवा बक्कळ पैसे!