मुंबई :  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज तब्बल 60 हजार पॉईंट्सची ऐतिहासिक पातळी सर केली. सेन्सेक्सच्या या घोडदौडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळपासूनच आज बाजारात उत्साहाचं वातारण होतं. आज दिवसभरात सेन्सेक्समध्ये 163 अंकाची भर पडली. बाजारातील आजच्या दिवसाचं ट्रेंडिग संपलं तेव्हा सेन्सेक्स 60,048 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांत निफ्टीला मात्र 18 हजाराचा विक्रमी पातळी गाठता आली नाही. आज दिवसअखेर निफ्टी 17,853 पॉईंट्सवर बंद झाला. 


दिवसभरातल्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 448 पॉईंट्सची उसळी घेत 60333 ची उच्चांकी पातळी गाठली होती तर निफ्टीने 17947 ने पातळी गाठली.. दुपारच्या सत्रानंतर सेन्सेक्समध्ये चढउतार कायम होते.  सेन्सेक्सने आज दिवसभरात गाठलेली पातळी आजवरची सर्वोच्च आहे. 


भारतीय शेअर बाजाराचे दोन प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (S&P BSE Sensex) आज विक्रमी पातळी गाठणार याची अनेक गुंतवणूकदारांना अपेक्षा होती. इन्फोसिस (Infosys), एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एशियन पेंन्ट्स (Asian Paints) या प्रमुख शेअर्सच्या कामगिरीमुळे शेअर बाजाराने 60 हजारांची पातळी गाठायला मदत केली. 


कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये आलेली घट, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वाढत असेलला वेग आणि देशातील आर्थिक विकासासाठी सकारात्मक वातावरण यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळाल्याचं मार्केटमधील जाणकार सांगतात. 


24 मार्च 2020 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कोविडच्या सावटाखाली आले होते. तेव्हा सेन्सेक्स 25638 या पातळीवर होता. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 125 टक्क्यांची भर पडली आहे. ही वाढ जवळपास 18 महिन्यांमध्ये झाल्याचं या क्षेत्रातल्या जाणकारांनी नोंदवलं आहे. 50 हजार ते 60 हजार हा टप्पा मुंबई सेन्सेक्सने फक्त नऊ महिन्यात पूर्ण केला आहे. ही आजवरची सर्वात वेगवान तेजी समजली जात आहे. 


कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेलं ग्रहण आता लवकरच सुटेल असा विश्वास शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आहे. पुढील दोनेक वर्षात देशाची अर्थव्यवस्था रुळावर येईल असाही विश्वास सेन्सेक्सच्या या घोडदौडीमागे असल्याचं सांगितलं जातंय.   


टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येही आज चांगली वाढ झालेली दिसली. मुंबई शेअर बाजारातील क्षेत्रनिहाय निर्देशांकापैकी टेलिकॉम इंडेक्समध्ये आज तब्बल तीन टक्क्याची तेजी दिसून आली. तर दुसऱ्या बाजूला मेटल, ऑईल आणि गॅस, उर्जा आणि एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा ताण दिसून आला. 


एशियन पेंट हा निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजी नोंदवणारा शेअर म्हणून गणला गेला. एशियन पेंटच्या शेअरमध्ये जवळपास पावणेचार टक्क्यांची वाढ होऊन 3445 रुपयांवर बंद झाला.