मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला आहे. सोमवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेनेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आता भांडवली बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सावरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामळे जागतिक स्तरावर विविध देशांच्या शेअर बाजारात दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. सोमवारी तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 6.4 टक्क्यानं घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात 5.5% तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत.
भांडवली बाजार उघडल्यानंतर गडगडला
प्री ओपनिंग सेशननंतर भांडवली बाजार उघडल्यानंतरही शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला तर निफ्टी 800 अंकांनी घसरला आहे. आशियाई बाजारातील मोठ्या पडझडीचे अपेक्षित परिणा भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाले. अमेरिकेकडून आयात कर लादण्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 60 रुपयांवर पोहोचला आहे. तर रुपयाही 50 पैशांनी महागला आहे. रुपया 85.24 वरुन 85.74 प्रति डॉलरवर गेला आहे. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतणुकदारांना मोठा धक्का बसला आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांची राखरांगोळी होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात शेअर बाजार सावरणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जागतिकीकरणाचे युग संपले?
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी एका लेखात म्हटले आहे की, जागतिकीकरणाचे युग संपले आहे. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्या ते देशाला संबोधित करतील, ज्यामध्ये ते जागतिकीकरण संपल्याची घोषणा करतील. जागतिकीकरणामुळे आता अनेकांना कोणताही फायदा होत नाही. यानंतर स्पर्धा वाढेल आणि जगभरात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील, असे स्टारमर यांनी म्हटले.
आणखी वाचा