Share Market Prediction: बुधवारी भारतीय शेअर बाजारातील व्यवहार किरकोळ घसरणीसह बंद झाले. आठवड्यातील पहिल्या दोन दिवसात बाजारात तेजी दिसून आली. आज बाजारात खरेदीचा जोर असेल का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आज बाजारात KFin Technologies या कंपनीची लिस्टिंग होणार आहे.
शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहारात अस्थिरता दिसून आली. बीएसईचा 30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स निर्देशांक 17.15 अंकांनी घसरून 60,910.28 अंकांवर बंद झाला. बुधवारी व्यवहाराच्या दिवशी एका वेळी सेन्सेक्समध्ये 213.66 अंकांपर्यंतची घसरण झाली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 9.80 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 18,122.50 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स मधील भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्स या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली. दुसरीकडे, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रिड आणि मारुती या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
आज, गुरुवारी, टाटा पॉवर कंपनी (Tata Power Company), अशोका बिल्डकॉन (Ashoka Buildcon), बँक ऑफ इंडिया (Bank of India), विप्रो (Wipro) आणि स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल (Spandana Sphoorty Financial) या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.
टाटा पॉवरची सहकंपनी असलेल्या Tata Power Renewable Energy या कंपनीला कर्नाटकमध्ये 255 मेगावॅट हायब्रिड पॉवर प्रोजेक्टचे कंत्राट मिळाले आहे. तर, अशोका बिल्डकॉन कंपनीला मध्य प्रदेशात 754.57 कोटी रुपयांचे तीन प्रकल्प मिळाले आहेत.
आज या कंपन्यांच्या शेअर दरात चढ-उतार?
MACD इंडिकेटरनुसार, संवर्धन मदर (Samvardhana Mother), सदर्न पेट्रोकेमिकल्स (Southern Petrochemicals) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी राहण्याचे संकेत आहेत.
तर, पार्श्वनाथ (Parsvnath), Carborundum, Gyscoal Alloys आणि V-Guard Industries या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होण्याची शक्यता आहे. MACD इंडिकेटरमध्ये या कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचे संकेत दिसून येत आहेत.
MACD इंडिकेटर काय आहे?
Moving Average Convergence/Divergence (MACD) हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. त्याआधारे संबंधित शेअर्समध्ये तेजी अथवा घसरण होणार याचा अंदाज लावता येतो.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)