Stock Market Opening Bell : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात निराशाजनक (Share Market Opening Bell) सुरुवात पाहायल मिळाली आहे. सेन्सेक्स 61,110 अंकावर तर निफ्टी 18,200 च्या खाली पोहोलच्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. जागतिक बाजारातही काही खास चित्र दिसत नसून व्यवहार सपाट असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बँक निफ्टीमध्ये थोड्या वाढीसह व्यवहार होताना दिसत आहे. यामुळे बँकांचे शेअर्स वाढले आहेत.
शेअर बाजारात आज निराशाजनक सुरुवात
आज 2023 या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवयसी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आहे. BSE सेन्सेक्स 92.91 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 61,074.88 वर उघडला. तर, निफ्टी 34.25 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 18,163.20 वर उघडला.
सेन्सेक्स आणि निफ्टीचे शेअर्स
सेन्सेक्समधील 30 पैकी 8 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 14 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 36 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
बाजारात 'या' शेअर्समध्ये तेजी
आज बाजारात बँकांचे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अॅक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक बँकांचे शेअर्स तेजीत आहेत. टाटा मोटर्स, एशियन पेंट्स आणि टीसीएस हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. या शेअर्समध्ये 0.90 ते 0.02 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
'या' शेअर्समध्ये घसरण
आज शेअर बाजारात सेन्सेक्सच्या विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, इन्फोसिस, एल अँड टी, मारुती, आयटीसी, एचडीएफसी, एचसीएल टेक, नेस्ले, भारती एअरटेल, एचयूएल, टाटा स्टील, रिलायन्स आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरणीसह व्यापार होताना दिसत आहे.
नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर
सोमवारी नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 327 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 92 अंकांनी वधारत बंद झाला. सोमवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांच्या तेजीसह 61,168 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 92 अंकांच्या तेजीसह 18,197 अंकांवर बंद झाला.