Share Market Opening on 19 January: मुंबई : गेल्या तीन दिवसांतील प्रचंड घसरणीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. खरेदीचा मंदावलेला वेग आणि ग्लोबल मार्केटमधील रिकव्हरी यामुळे शेअर बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच रॉकेट वेगानं सुसाट वधारताना दिसले.


सेन्सेक्स आणि निफ्टीनं 0.80 टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहारात चांगली सुरुवात केली. काल (गुरुवारी) सेन्सेक्स 71,186.86 वर बंद झाला. त्या तुलनेत शुक्रवारी सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 71,786.74 वर उघडला. BSE लिस्टेड टॉप 30 शेअर्समध्ये केवळ इंडसंड्स बँकेचे शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळालं. तर इतर शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 


निफ्टी आज 21,615.20 च्या पातळीवर उघडला. तो उघडताच 183 अंकांनी उसळी घेतली होती. याशिवाय बँक निफ्टी देखील आज ग्रीन झोनमध्ये होता, तो 420 अंकांनी किंवा 0.92 टक्क्यांनी वाढून 46,134 स्तरावर व्यवहार करत होता.


एचडीएफसी बँकेचे शेअर्स जोमात


बीएसईच्या टॉप 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. केवळ इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.20 टक्क्यांनी वाढून 1490 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय टाटा स्टील, पॉवरग्रीड, सन फार्मा, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. टायटनचे जास्तीत जास्त शेअर्स 2.66 टक्क्यांनी वाढून 3839 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते.


'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ


शुक्रवारी, ऑईल आणि गॅसपासून बँक निफ्टीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वात मोठी वाढ फायन्शिअल सेक्टर्समध्ये दिसून आली, जे 1 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार करत होते. तर बँक निफ्टी 0.85 टक्क्यांच्या उसळीसह 46,100.70 वर आणि ऑटो क्षेत्र 0.56 टक्क्यांच्या उसळीसह 18,599.75 वर व्यवहार करत आहे.


शेअर बाजारात मोठी घसरण 


मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती, जी गुरुवारीही कायम राहिली. तीन दिवसांत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. बुधवारी सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरला होता. निफ्टीतही मोठी घसरण झाली.