Share Market Opening Bell: मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागल्याचे दिसून आले. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारात पडझड झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
सोमवारी, शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे दिसून आले होते. आज, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 231.30 अंकांच्या तेजीसह 57,376 च्या पातळीवर खुला झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 94.60 अंकांच्या निर्देशांकासह 17,110 अंकांवर खुला झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या तेजीसह 57,279.18 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 19 अंकांच्या तेजीसह 17,035.80 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांमध्ये सेन्सेक्स 450 अंकांनी वधारत 57600 चा टप्पा ओलांडला. निफ्टीत 115 अंकांची तेजी दिसून आली. त्यामुळे निफ्टी 17135 अंकांच्या पातळीवर पोहचला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 पैकी 44 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
बाजारात सुरुवातीला तेजी दिसून आल्यानंतर काही वेळाने खरेदीचा दबाव दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. खरेदी आणि विक्रीच्या दबावामुळे बाजारात अस्थिरता दिसून येण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर दरात 1.33 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, ऑईल अॅण्ड गॅसमध्ये 1.24 टक्क्यांची तेजी दिसली. आयटी इंडेक्स एक टक्क्यांनी वधारला. फार्मा, मीडिया, मेटल, रियल्टी, ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू आणि हेल्थकेअरमधील सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली.
प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 138 अंकांनी वधारत 57283 पातळीवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 122 अंकांच्या तेजीसह 17138 अंकावर व्यवहार करत होता.
सोमवारी बाजारात घसरण
सोमवारी, सेन्सेक्समध्ये 953 अंकांची घसरण झाली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 311 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.79 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 930 अंकांची घसरण होऊन तो 38,616 अंकावर पोहोचला होता. सोमवारी शेअर बाजार बंद होताना 630 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2860 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.