Share Market Opening Bell: शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहारात तेजी दिसून आली आहे. शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) 171 अंकांनी वधारला असून  60,002 अंकावर खुला झाला आहे. तर, निफ्टी निर्देशांकात (Nifty) 77 अंकांची तेजी दिसत असून 17,808 अंकांवर खुला झाला आहे.


तेजीसह शेअर बाजार वधारला असली नफा वसुलीदेखील दिसून येत आहे. त्यामुळे आज दिवसभरातील व्यवहारात अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे. सकाळी 9.47 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 20 अंकांनी वधारत 59,852.13 अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12.80 अंकांच्या तेजीसह 17,743.55 अंकावर व्यवहार करत होता. 


आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, मीडिया, एफएमसीजी, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमध्ये घसरण दिसू येत आहे. 


जेएसडब्लू स्टील 2.10 टक्के, मारुती सुझुकी 2 टक्के, टाटा मोटर्स 1.93 टक्के, आयशर मोटर्स 1.67 टक्के, डॉ. रेड्डी 1.43 टक्के, सिप्ला 1.17 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 1.06 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.96 टक्के, सन फार्मामध्ये 0.95 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.


इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.76 टक्क्यांची घसरण दिसून आली. नेस्ले कंपनीच्या शेअर दरात 1.56 टक्के, पॉवरग्रीड 1.51 टक्के, एचयूएलमध्ये 1.08 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.08 टक्क्यांची घसरण दिसून आली. बजाज फायनान्सच्या शेअर दरात 1.06 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 1.04 टक्के, डिव्हीज लॅब 0.95 टक्के, ब्रिटानिया कंपनीच्या शेअर दरात 0.84 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तेजी 


सोमवारी,  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या एक तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 524 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 162 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,831 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्येही 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,730 अंकांवर स्थिरावला. 


मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारातील सेन्सेक्स 60 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सेन्सेक्स 59,831 अंकावर स्थिरावला. मुहूर्त ट्रेडिंगच्या  दिवशी 2606 कंपन्यांच्या शेअर्स दरामध्ये वाढ झाली तर 727 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.