Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक उसळण घेतल्यानंतर आजही बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे. गुरुवारी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसह 63,467 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी वधारत 18,871 अंकांवर खुला झाला. अमेरिकन शेअर बाजार वधारत बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसून येत होता. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने 63500 अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टी निर्देशांकाने 18,887 अंकांचा टप्पा गाठला. सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 266 अंकांनी वधारत 63,366.41 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 75 अंकांच्या तेजीसह 18,833.55 अंकांवर व्यवहार करत होता.
बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर, ऑटो, एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर दरात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत असून 10 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 27 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. तर, 23 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज आयटी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. टेक महिंद्राच्या शेअर दरात 2.01 टक्के, इन्फोसिच्या शेअर दरात दोन टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.74 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 1.73 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 1.55 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. एचडीएफसी बँक 1.50 टक्के, लार्सन अॅण्ड ट्रुबो 1.28 टक्के, डॉ. रेड्डी कंपन्यांच्या शेअर दरात 0.85 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
तर, काही कंपन्यांच्या शेअर दरात नफावसुली दिसून येत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर दरात 0.94 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.67 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 0.49 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 0.36 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 0.35 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.