Share Market Closing Bell : गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर  खरेदी दिसून आली. जागतिक शेअर बाजारात मिळालेले सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारून बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1500 अंकाची उसळण दिसून आली. तर, निफ्टी 16000 अंकावर व्यवहार करत होता. 
 
बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1546 अंकाची उसळण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशाक 54,343 अंकावर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 462 अंकानी उसळला. निफ्टी 16274 अंकावर बंद झाला. चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दर घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. त्याशिवाय अनेक चांगल्या स्टॉक्समध्ये घसरण झाल्याने कमी किंमतीत शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणुकदारांनी भर दिला. 


शेअर बाजारातील आजच्या तेजी सर्वच क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बँक निफ्टीमध्ये 2.89 टक्के म्हणजे 962 अंकानी वधारला. बँक निफ्टी आज 34277 अंकावर बंद झाला. त्याशिवाय, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मीडिया या क्षेत्रातील शेअर वधारले. निफ्टीमधील  50 पैकी 48 शेअर तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 30 शेअर्स वधारले होते. 


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स या स्टॉक्समध्ये चांगली खरेदी झाली. 


आज बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 665.12 अंकानी वधारला. निफ्टीने सुरुवातीलाच 16000 अंकाचा टप्पा ओलांडला. आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला होता. जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली. गुरुवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी, तर निफ्टी 430 अंकानी घसरला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: