Share Market Closing Bell : आज भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. आठवड्यातील दुसऱ्या दिवशीदेखील शेअर बाजारात तेजी (Share Market) दिसून आली. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली झाल्याने बाजारात घसरण दिसून आली.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 578 अंकांनी वधारत 59,719 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 194 अंकांनी वधारत 17,816 अंकांवर बंद झाला.
मंगळवारी शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तू, एनर्जी, मेटल्स सेक्टरमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 44 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 24 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3602 कंपन्यांमध्ये ट्रेडिंग झाली. यातील 2106 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 1365 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, 131 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. आज शेअर बाजाराचे बाजार भांडवल मूल्य 283.32 लाख कोटी रुपये इतके झाले.
सन फार्मामध्ये 4.22 टक्के, डॉ. रेड्डी लॅबमध्ये 3.31 टक्के, टाटा स्टीलमध्ये 2.86 टक्के, इंडसइंड बँकेत 2.77 टक्के, टायटन कंपनीत 2.10 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.97 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.935 टक्क्यांची तेजी दिसून आली.
नेस्लेच्या शेअर दरात 0.64 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.22 टक्के, इन्फोसिसमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण दिसून आली.
आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 415.68 अंकांच्या तेजीसह 59,556.91 अंकांवर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 148.15 अंकांच्या तेजीसह 17,770 अंकांवर खुला झाला होता. बाजारातील व्यवहार सुरू होताच निफ्टीने काही मिनिटाच्या अवधीतच 17800 चा टप्पा पार केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: