Share Market News: सोमवारी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला होता. आज, मात्र शेअर बाजारात आज विक्रीचा सपाटा दिसून आला. आज शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Fall) दिसून आली. काल दिवाळी साजरी केलेल्या गुंतवणूकदारांचे आज दिवाळं निघालं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 631.83 अंकांनी घसरून 60,115.48 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 187.05 अंकांच्या घसरणीसह 17,914.15 अंकांवर स्थिरावला.
आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजारातील व्यवहार किंचींत तेजीसह सुरू झाले. त्यानंतर बाजारात नफा वसुलीचा दबाव वाढू लागला होता. सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक 60,000 अंकांखाली घसरला होता. तर, निफ्टी निर्देशांकाने आज दिवसभरात 17,856 अंकांची निच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरला. सेन्सेक्स 60,115.48 अंकांवर आणि निफ्टी 17,914.15 अंकांवर बंद झाला. आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1376 कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, 2027 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 152 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
या शेअर्समध्ये दिसली तेजी
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 22 कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 33 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीत टाटा मोटर्सच्या शेअर दरात 5.92 टक्क्यांनी वाढ झाली. त्याशिवाय, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, पॉवरग्रीड, डिव्हिज लॅब आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 5.67 टक्क्यांची घसरण दिसून आली. भारती एअरटेल, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस, स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | आजचा उच्चांक | आजचा नीचांक | किती टक्क्यांनी बदल |
BSE Sensex | 60,115.48 | 60,809.65 | 59,938.38 | -1.04% |
BSE SmallCap | 28,794.89 | 28,976.17 | 28,712.58 | -0.46% |
India VIX | 15.51 | 15.935 | 14.5625 | 0.0585 |
NIFTY Midcap 100 | 31,559.30 | 31,771.00 | 31,383.70 | -0.50% |
NIFTY Smallcap 100 | 9,652.25 | 9,734.45 | 9,621.75 | -0.59% |
NIfty smallcap 50 | 4,321.60 | 4,351.05 | 4,310.90 | -0.47% |
Nifty 100 | 18,081.00 | 18,274.40 | 18,008.30 | -0.92% |
Nifty 200 | 9,475.35 | 9,571.45 | 9,435.50 | -0.86% |
Nifty 50 | 17,914.15 | 18,127.60 | 17,856.00 |
-1.03% |
घसरणीने गुंतवणूकदारांना फटका
बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.84 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी 282.92 लाख कोटी रुपये होते. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.