Share Market Closing Bell : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. दुपारी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दर वाढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली. रेपो दरवाढीच्या निर्णयामुळे विक्रीचा सपाटा सुरू झाला. शेअर बाजारातील अखेरच्या सत्रात सेन्सेक्स 1400 अंकानी घसरला होता. त्याशिवाय, बँकिंग, आयटी, ऑटोसह सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. 


आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 1306.96 अंकाची घसरण दिसून आली. सेन्सेक्स 55,669.03 अंकावर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 391.50 अंकाची घसरण होत 16,677.60 अंकावर बंद झाला. 


शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समधील टॉप 30 पैकी 27 स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. तर, तीन स्टॉकमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. पॉवरग्रीडच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. एनटीपीसी आणि कोटक बँकचे शेअर्सदेखील तेजीत होते. 


बजाज फायनान्समध्ये 4.29 टक्क्यांची घसरण झाली. त्याशिवाय बजाज फिनसर्व, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, मारूती, रिलायन्स, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचसीएल टेक, टीसीएस आदी स्टॉकच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. 


दरम्यान, आज सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली. शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स वधारला होता. मात्र, काही वेळेनंतर किंचित घसरण झाली. प्री-ओपनिंग सत्रात बाजार वधारला असल्याचे दिसून आले. आज बीएसईचा 30 शेअरचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 148.92 अंकानी वधारत 57,124.91 अंकावर सुरू झाला. त्याशिवाय, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 27.50 अंकांच्या तेजीसह 17,096.60 अंकांवर खुला झाला होता.


रेपो दरात वाढ


वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी मॉनिटरिंग समितीने रेपो दरात 40 बीपीएसने वाढ केली आहे. २५ बेसिस पाॅईंट्सनं रेपो रेटमध्ये वाढ होणार अशी अपेक्षा असताना ४० बीपीएसनं वाढ झाल्याने शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याचे म्हटले जात आहे.