Share Market Closing Bell: आज भारतीय शेअर बाजारात दिवसभर विक्रीचा दबाव दिसून आला. सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार काही प्रमाणात सावरला. मात्र, घसरणीसह बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) 400 अंकांनी कोसळला होता. मात्र, त्यानंतर बाजार सावरला. मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बाजाराला सावरण्यास मदत झाली. बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांक आज तेजीसह बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 69.68 अंकांच्या घसरणीसह 60,836 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30.15 अंकांच्या घसरणीसह 18,052 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1431 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, 1359 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
बँक निफ्टीतही विक्रीच्या दबावाने घसरण झाली होती. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बँक निफ्टी एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर, आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मेटल शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. तर, ऑटो, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. तर, 16 कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, मारूती, एचसीएल टेक आदी कंपन्यांचे शेअर्स वधारले.
तर, नेस्ले, आयटीसी, एल अॅण्ड टी, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, पॉवरग्रीड आदी कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून आला.
घसरणीसह बाजाराची सुरुवात
भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 60500 अंकांखाली तर निफ्टी 18000 अंकांखाली सुरू झाला होता.