मुंबई : ऑक्टोबर महिन्यातील व्यवहाराचा पहिलाच दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक दिसून आला. एनर्जी, बँकिंग आणि ऑटो स्टॉक्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आल्याने बाजारात घसरण झाली. जागतिक पातळीवरील घडामोडींचा शेअर बाजारावर दबाव  असल्याचे दिसून आले. आज, दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 316 अंकांच्या घसरणीसह 65,512 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 19,528 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आजच्या व्यवहारात एनर्जी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. त्याशिवाय, ऑटो, बँकिंग, फार्मा, एफएनसीजी, मेटल, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मात्र, ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, रिअल इस्टेट आणि सरकारी बँकांचे निर्देशांक वधारत बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने निर्देशांक वधारला. 

सेन्सेक्स निर्देशांकामधील 30 कंपन्यांपैकी 12  कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर निफ्टी निर्देशांकाती 50 कंपन्यांपैकी 13 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex65,512.1065,813.5065,344.59-0.48%
BSE SmallCap37,789.5837,819.8337,586.650.61%
India VIX11.7912.4110.782.93%
NIFTY Midcap 10040,608.8540,666.0040,382.300.18%
NIFTY Smallcap 10012,816.2012,837.2012,718.950.53%
NIfty smallcap 505,923.155,930.955,864.850.68%
Nifty 10019,492.7019,571.5019,434.45-0.43%
Nifty 20010,474.6010,508.6510,443.35-0.34%
Nifty 5019,528.7519,623.2019,479.65-0.56%

गुंतवणूकदारांना फायदा...

शेअर बाजारात आज घसरण झाली तरी गुंतवणूकदारांना फायदा झाला. शेअर बाजारात मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 319.22 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी बाजार भांडवल 319.08 लाख कोटी रुपये इतके होते. याचाच अर्थ बाजारात भांडवलात 14 हजार कोटींचा फायदा झाला असल्याचे दिसून आले. 

1907 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी

मुंबई शेअर बाजारावर (BSE) वर आज वधारत बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या अधिक आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,956 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,907 शेअर्स तेजीसह बंद झाले. 1,860 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 189 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 262 कंपन्यांच्या शेअर्स दराने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 39 कंपन्यांच्या शेअर्स दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नवा नीचांकी दर गाठला.