मुंबई: आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) दिवसभर अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात चढउतार दिसून आला. या अस्थिरतेच्या वातावरणात मिड कॅप स्टॉक्समध्ये (Mid Cap Stocks) गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसल्याने निर्देशांक वधारला. आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) फक्त 4 अंकांनी वधारत 65,220 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 3 अंकांनी वधारत 19,396 अंकांवर बंद झाला.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. तर, फार्मा, आयटी, बँकिंग सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आल्याने घसरण झाली. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. मिड कॅप इंडेक्समध्ये 1 टक्का अर्थात 418 अंकांच्या तेजीसह 38,544 अंकांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 65,220.03 | 65,362.91 | 65,165.45 | 0.01% |
BSE SmallCap | 35,850.19 | 35,873.15 | 35,619.85 | 0.89% |
India VIX | 11.75 | 12.09 | 11.59 | -1.78% |
NIFTY Midcap 100 | 38,544.30 | 38,563.00 | 38,237.65 | 1.10% |
NIFTY Smallcap 100 | 11,852.50 | 11,861.20 | 11,797.55 | 0.81% |
NIfty smallcap 50 | 5,378.05 | 5,382.30 | 5,348.35 | 0.86% |
Nifty 100 | 19,325.45 | 19,364.25 | 19,305.50 | 0.11% |
Nifty 200 | 10,317.25 | 10,331.20 | 10,299.20 | 0.26% |
Nifty 50 | 19,396.45 | 19,443.50 | 19,381.30 | 0.01% |
गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फायदा
आजच्या व्यवहारात बाजारात अस्थिरता दिसून आली तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) 308.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी, हे बाजार भांडवल 306.39 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.96 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.
2165 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ
मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात आज वाढ नोंदवण्यात आली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,785 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2165 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1503 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर 117 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणत्याही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 252 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 38 कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. आज कोणत्याही कंपनीच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठले नाही. तर, दोन कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले.