Share Market News:  भारतीय शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली. बाजारातील अस्थिरतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मंगळवारी झालेल्या घसरणीच्या तुलनेत आज बाजार सावरल्याचे चित्र दिसून आले. बाजारातील आजचे व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 9.98 अंकांच्या घसरणीसह 60,105.50 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18.50 अंकांच्या घसरणीसह  17,895.70 अंकांवर बंद झाला.  


आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1830 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1566 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 16 कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी 50 मधील 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 32 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


निफ्टीने आज दिवसभरात 17,976.35 अंकांचा उच्चांक गाठला होता. तर, 17,824.35 अंकांचा निचांक गाठला होता. 


निफ्टी निर्देशांकात हिंदाल्को, सन फार्मा, बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट आणि  एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, भारती एअरटेल, सिप्ला, डिव्हीज लॅब, अपोलो हॉस्पिटल आणि एचयूएल आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


बँक निफ्टीत तेजी


आज बँक निफ्टी निर्देशांकात तेजी  दिसून आली. बँक निफ्टी 217.95 अंकांनी वधारत 42,232.70  अंकांवर स्थिरावला. 


रुपयात तेजी 


डॉलरच्या तुलनेत आज रुपया 21 पैशांनी वधारला. सलग दुसऱ्या दिवशी रुपया वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपया 81.57 वर बंद झाला. काही प्रमाणात वाढलेली परदेशी गुंतवणूक, कच्च्या तेलाचे घसरलेले दर आणि परकीय चलनसाठ्यात वाढ झाल्याने आज रुपयात तेजी दिसून आली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 


दोन लाख कोटींचा चुराडा


शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजार सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल मंगळवारी 280.89 लाख कोटी रुपये इतके झाले. सोमवारी 9 जानेवारी रोजी, बीएसईचे बाजार भांडवल 282.99 लाख कोटी रुपये इतके झाले होते. मंगळवारी झालेल्या बाजारात झालेल्या घसरणीमुळे बाजाराच्या भाग भांडवलात 2.10 लाख कोटींची घट झाली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: