Share Market Updates :  भारतीय शेअर बाजारात आज काही प्रमाणातील अस्थिरता दिसून  आली. शेअर बाजारातील व्यवहार बंद होताना महत्त्वाचे निर्देशांक वधारले होते. शेअर बाजारातील प्रमुख सूचकांकात सुरुवातीला घसरण दिसून आली. त्यानंतर खरेदीचा जोर दिसून आल्याने तेजी दिसली. आज दिवसभरातील मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स  123.63 अंकांनी वधारत  60,348.09 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 42.90 अंकांच्या तेजीसह 17,754.40 अंकांवर स्थिरावला. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात सलग सहाव्या दिवशी तेजी दिसून आली.


आज शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1894  कंपन्यांचे शेअर वधारले. तर, 1502 कंपन्यांचे शेअर घसरले. 119 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. डॉलरच्या तुलनेत आज रुपयात घसरण झाली. रुपया आज 82.05  वर स्थिरावला. 



आयटी, मेटल, फार्मा, रियल्टी, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीत आज तेजी दिसून आली. त्यामुळे बाजाराला सपोर्ट दिसून आला. 


सेन्सेक्समधील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 28 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 


या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी


इंडसइंड बँक, एल अॅण्ड टी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एसबीआय, मारुती सुझुकी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड बँक या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. 


अदानी समूहाच्या शेअर दरात तेजी 


अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी तेजी दिसून आली. बुधवारी 10 पैकी 10 कंपन्यांचे शेअर मजबूत झाले आहेत. पाचमध्ये अप्पर सर्किटही लागले. या तेजीच्या दरम्यान, समूह समभाग अलीकडील नीचांकी पातळीवरून जवळपास 105 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याचबरोबर समूह कंपन्यांचे बाजार भांडवलही सुमारे 8.50 लाख कोटींवर पोहोचले आहे.