Share Market Closing Bell: मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी जबरदस्त दिसून आला. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 383 अंकांनी वधारत 62,887 अंकांची उच्चांकी पातळी गाठण्यास यश मिळवले. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 18678 अंकांची पातळी गाठत आतापर्यंतचा उच्चांक गाठला.
शेअर बाजारात आज दिवसभर खरेदीचा जोर दिसून आला. मात्र, बाजार बंद होताना नफावसुली झाल्याने तेजीला काहीसा लगाम लागला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 177 अंकांच्या तेजीसह 62,681 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 55.30 अंकांच्या तेजीसह 18618 अंकांवर स्थिरावला. निफ्टीत आज बाजारात व्यवहार झालेल्या 1653 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1717 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते. 147 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर दर वधारले तर 15 कंपन्यांचे दर घसरले. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते.
निफ्टीमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, हिरोमोटो कॉर्प, सिप्ला आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअर दरात मोठी तेजी दिसून आली. तर, इंडसइंड बँक, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी आणि पॉवरग्रीड आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. शेअर बाजारात आज एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. याशिवाय बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या सेक्टरमधील शेअर दर वधारले. तर, दुसरीकडे इन्फ्रा, रिअल इस्टेट ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही नफा-वसुली दिसून आली.
आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा किंचीत घसरण दिसून आली होती. त्यानंतर खरेदीचा जोर दिसून आला. काही वेळेतच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. निफ्टीने 18,631.65 हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. तर, सेन्सेक्सने 62,724.02 गाठला होता. त्यानंतर बाजारात थोडी घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसून आला आणि सेन्सेक्स, निफ्टीने उच्चांक गाठला.