Share Market : भारतात शेअर बाजारानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मुंबई शेअर बाजारानं नवा उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारानं 60 हजारांचा आकडा गाठला आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 273 अंकानी उसळी घेत 60 हजारांपार पोहोचला. सेंसेक्स 273 अंकांनी वाढण्यासोबतच 60,158.76 उघडला. एक दिवसाअगोदर म्हणजेच, गुरुवारी सेंसेक्स 59,885.36 अंकावर बंद झाला होता. तर गुरुवारी मुंबई शेअर मार्केटमध्ये 958 अंकांची उसळी पाहायला मिळाली होती.


नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही आज इतिहास रचू शकतो. निफ्टी 18 हजारांचा आकडा पार करण्यापासून काही अंक दूर आहे. गुरुवारी निफ्टीनं 276.30 अंकं म्हणजेच, 1.57 टक्क्यांनी वधारुन 17,822.95 अंकावर पोहोचला होता. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हनं गुरुवारी व्याज दरांत कोणताही बदल केला नव्हता, त्यामुळेच भारतासह जगभरातील शेअर बाजारांत तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी अमेरिकी बाजारात एक टक्क्यानं तेजी पाहायला मिळाली होती. 


अशातच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी अमेरिकेत पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वार्जमॅन म्हणाले होते की, "भारत जगातील ब्लॅकस्टोनची गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम बाजारपेठ आहे. हा आता जगातील सर्वात वेगाने प्रगती करत असलेला देश आहे. त्यामुळे आम्ही खूप आशावादी आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की, आम्ही भारतात चांगली गुंतवणूक केली आहे."


डिझेल कडाडलं, 70 दिवसांनी दरांत वाढ


देशात डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ (Diesel Price Hike) झाली आहे. शुक्रवार म्हणजेच, 24 सप्टेंबर 2021 रोजी दोन महिन्यांहून अधिक काळानं देशात डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, डिझेलच्या किमतीत 20 ते 22 पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशातच पेट्रोलचे दर (Petrol Price) मात्र स्थिर आहेत. मुंबईत डिझेलची किंमत दरवाढीनंतर 96.19 रुपये प्रति लिटरवरुन 96.41 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत डिझेल 88.62 रुपये प्रति लिटरवरुन 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.