SEBI On Social Media Finfluencers: सोशल मीडिया आणि युट्यूबवर शेअर बाजारासंबंधी गुंतवणुकीसंबंधी सल्ला देणाऱ्या बनावट आणि बिगर नोंदणीकृत सल्लागारांना चाप लवकरच चाप बसणार आहे. शेअर बाजार नियामक सेबीकडून यासंबंधी येत्या एक ते दोन महिन्यांत अनोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांना चाप लावण्यासाठी अटी आणि  मार्गदर्शक तत्त्व निश्चित करण्यात येणार आहेत.

Continues below advertisement


याविषयी सेबीची नुकतीच बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आर्थिक सल्लागारांबाबत एक महत्त्वाचं परिपत्रक तयार करण्यात येत असून, येत्या दोन महिन्यात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी यासंबंधीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी सेबीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली आहे.


सोशल मीडियावर भरमसाठ सल्लागार


गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर्थिक गुंतवणूक, वित्तीय सल्ला देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हाट्सअॅप आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवरून  या मंडळींकडून बाजारात गुंतवणूक करण्याविषयी सल्ले दिले जात असतात. हे सल्ले देणारे सल्लागार सेबीकडे नोंदणीकृत नसतात. बऱ्याचदा अशा लोकांकडून फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत सेबीकडून अनेकदा सावधानतेचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सेबीकडून आता नोंदणी नसलेल्या सल्लागारांवर कारवाईसाठी पावले उचलण्यात येणार आहे. सेबीने असे संकेत याअगोदर सुद्धा दिले होते.


अनोंदणीकृत सल्लागारांमुळे समस्यांचा डोंगर


सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांना बाजार आणि गुंतवणुकीची जाणीव करुन देणाऱ्यांची आम्हाला अडचण नाही, परंतू त्या सल्लागारांनी कोणतंही कारण न देता सल्ला दिला असेल आणि त्यांनी सेबीमध्ये नोंदणी केली नसेल तर मात्र ही मोठी समस्या ठरते.


टॉप-35 प्रभावकांना आयटी विभागाची नोटीस


सेबीकडून नोंदणी नसलेल्या प्रभावकांवर कारवाईचे संकेत अशावेळी मिळत असताना दुसरीकडे देशातल्या टॉप-35 सल्लागारांना आयटी विभागाची नोटीस कोट्यवधींचा कर चुकवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात 13 मोठ्या युट्यूबरच्या ठिकाणांवर चौकशी आणि तपास देखील करण्यात आला होता. 


प्रामुख्याने हे सल्लागार सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या दर्शकांच्या आधारे मोठी रक्कम मिळवतात, तर दुसरीकडे याच सल्लागारांनी केलेल्या स्टॉकमध्ये व्यापार करुन पैसे कमावतात.


जितके फॉलोवर्स तितकी कमाई


एका रिपोर्टनुसार, सोशल मीडियावरुन या सल्लागारांचा कारभार वर्ष 2025 पर्यंत 2000 कोटीपर्यंत जाऊ शकतो. 2021 साली हाच कारभार 900 कोटींच्या घरात होता. ज्यांचे साधारण 10 ते 50 हजार फॉलोवर्स आहेत असे सल्लागार एका पोस्टसाठी 5000 ते तीस हजारापर्यंतची कमाई करतात, यासोबत ज्यांचे फॉलोवर्स पाच लाखांच्या पुढे आहेत ते लाखो रुपये या माध्यमातून कमावत असतात. परंतू हेच उत्पन्न ते पूर्णपणे दाखवत नसल्याचा आरोप केला जात आहे.