Rupee Falls Against Dollar:  डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली ऐतिहासिक घसरण कायम सुरू आहे. रुपयाने पहिल्यांदाच एका डॉलरच्या तुलनेत 78 रुपयाचा स्तर गाठला. आज रुपयात 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री सुरू आहे. त्याच्या परिणामी रुपयातही घसरण सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रुपयात डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे. जागतिक पातळीवर असलेली अस्थिरता आणि वाढती महागागई यासारख्या कारणांमुळे गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढली जात आहे. रुपयाने आतापर्यंतचा नीचांकी दर 78.26 रुपये गाठला आहे. युक्रेन-रशिया युद्धाला 23 फेब्रुवारी 2022 रोजी सुरुवात झाली होती. त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.62 रुपयांवर होता. त्यानंतर रुपयात सातत्याने घसरण सुरू आहे. रुपयांच्या घसरणीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


रुपयात आज घसरण का?


अमेरिकेत महागाईचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.  महागाई दराचे आकडे समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आता वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.


परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा


परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे. 


FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.