मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयनं बँकिंग नियमांचं पालन करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला  62 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

Continues below advertisement

RBI : आरबीआयचा कोटक महिंद्रा बँकेला दणका

आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईबाबत माहिती देताना म्हटलं की ॲक्सेस टू बँकिंग सर्व्हिसेस- बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट , बिझनेस कॉरस्पॉन्डंटस संबंधित नियमांशिवाय क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रुल 2006 चं पालन करण्यात बँक कमी पडल्याचं समोर आलं आहे. यामुळं बँकेला 11 डिसेंबरच्या आदेशानं 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 31 मार्च 2024 ला आरबीआयकडून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत वैधानिक पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं होतं. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेनं बीएसबीडी अकाँऊट अशा खातेदारांची उघडली ज्यांच्याकडे पहिल्यापासून बँक खाती होती हे आरबीआयच्या निदर्शनास आलं. याशिवाय  बँकेनं निश्चित मर्यादेबाहेर जाऊन काही कामांसाठी बिझनेस कॉरस्पाँडटस् सोबत करार केले होते. याशिवाय बँकेनं काही कर्जदारांबाबतची चुकीच्या पद्धतीनं क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्यांना दिली होती. 

Continues below advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या संदर्भात कोटक महिंद्रा बँकेला  अगोदर नोटीस दिली होती, त्याद्वारे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. यानंतर बँकेनं दिलेल्या उत्तरांचा विचार केल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे असल्याचं आढळून आल्यानं दंडाची कारवाई करण्यात आली. बँकेकडून स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये देखील याबाबत माहिती दिली आहे. कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयनं सांगितलं आहे. 

बँकेच्या शेअरवर काय परिणाम होणार?

कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं कारवाई केल्याचं जाहीर केलं आहे. आता सोमवारी शेअर बाजारात बँकेच्या शेअवर काय परिणाम होणार हे पाहावं लागेल. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बँकेच्या स्टॉकमध्ये  घसरण पाहायला मिळाली होती.  कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 2159.60 रुपयांवर आहे. बँकेचं बाजारमूल्य 4.29 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना24 टक्के रिटर्न दिला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)